औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु प्रत्यक्षात रेल्वेस्थानकावर धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई आणि अग्निशमन साधनांची अवस्था पाहता रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी किती बेफिकीर आहे, हे दिसून येत आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे; परंतु अनेक रेल्वेगाड्यांबरोबर रेल्वेस्थानकावर अग्निशमन साधनांची अवस्था पाहता प्रवाशांच्या सुरक्षेविषयी रेल्वेला अनास्था असल्याचे दिसत आहे. आगीवर नियंत्रणासाठी आग विझविणारी साधने, वाळूची बादली महत्त्वाची ठरू शकते; परंतु रेल्वेस्थानकावरील आग विझविणारी साधने तोकडी पडत असल्याचे दिसते. वाळूच्या बादलीचा वापर कचरा टाकण्याची आणि पान, तंबाखू खाणाऱ्यांसाठी थुंकण्याची जागा बनल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा स्थितीमुळे अन्य एखाद्या आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दल येईपर्यंत या बादलीचा काहीही उपयोग होणार नाही. यामुळे एखाद्या ठिणगीचे आगीत रूपांतर होण्यास हातभारच मिळत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. रेल्वेस्थानकावर सोमवारी विविध रेल्वे गाड्यांमध्ये पाहणी करताना पोलीस कर्मचारी दिसून आले. त्यामुळे पोलीस प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष असल्याचे दिसून आले. याविषयी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.धूम्रपान करणाऱ्यांवर करडी नजररेल्वे बोगीला आग लागलेल्या घटनेनंतर धूम्रपान करण्यावर करडी नजर असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारपर्यंत एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रेल्वे तिकिटांची तपासणी करण्याबरोबर धूम्रपान करणाऱ्यावर नजर ठेवली जात आहे. थेट रेल्वे बोगीत धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण मात्र अल्प असल्याचे चित्र दिसून येते.मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येणाऱ्या औरंगाबाद रेल्वेस्थानकावर मेटल डिटेक्टरची अवस्था विचित्र दिसून येते. प्रवासी त्यातूनच येईल, असे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. ४रेल्वे प्रवाशांकडील सामानाच्या तपासणीसाठीही कोणती यंत्रणा नाही. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेचा सुरक्षेकडे कानाडोळा होत असल्याचेच दिसत आहे.
आगीच्या घटनेनंतरही रेल्वेचे सुरक्षेकडे दुर्लक्ष
By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST