हिंगोली : जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीकडे विधानसभेच्या धामधुमीत राजकीयदृष्ट्या दुर्लक्षच होत आहे. खरेतर मागची पदाधिकारी निवडच जिल्ह्यातील बऱ्याच राजकीय वितुष्टांना कारणीभूत ठरली होती. अजूनही त्याचे परिणाम शिवसेनेतील काहींना भोगावे लागत आहेत. मात्र यावेळी विधानसभेच्या उमेदवारीकडे लक्ष लागलेल्यांना जि.प.त रस नाही.मागील वेळी जि.प.तील पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेत गटतटाच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यात लाट असताना हिंगोली लोकसभेत शिवसेनेला आपली जागा गमवावी लागली होती. आताही सर्वांची भूमिका सावध आहे. थोडीही ठिणगी पडली तर प्रकरण भडकेल अन् पराभवाच्या होरपळीत ढकलले जाण्याची भीती आहे. माजी खा.सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, माजी आ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख संतोष बांगर या सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षाला पुढची रणनीती आखावी लागणार आहे. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही संधी शोधत आहे. गटातटाची भाषा झाल्यास सगळी सभापतीपदे सोडण्याची तयारी दर्शविण्यापर्यंत भूमिका घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीमुळे जि.प. तील गटतटांना फारसा वाव मिळत नसल्याचे मात्र दिसत आहे. वानखेडे यांना नांदेडात उमेदवारी पाहिजे आहे. तर घुगे यांना कळमनुरीत व मुंदडा यांना वसमतमध्ये. त्यामुळे पक्षाचा आदेश डावलणे तर अवघडच आहे. मात्र गट-तटाला खतपाणी घालणेही परवडणारे नाही, हे सगळेच जाणून आहेत. त्यामुळे सावध भूमिका घेत आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षांना आकाशही ठेंगणे आहे. त्यातून काही चमत्कार घडलाच तर नवल नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या काही जि. प. सदस्यांनी या पार्श्वभूमीवर खा. राजीव सातव, आ.जयप्रकाश दांडेगावकर, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांची काय रणनीती राहते, याकडेही लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जि.प.च्या निवडीकडे विधानसभेमुळे दुर्लक्ष
By admin | Updated: September 17, 2014 00:20 IST