लातूर : महिला शिक्षणाला चालना मिळावी म्हणून मुलींचे स्वतंत्र शाळा-महाविद्यालये अस्तित्वात आली आहेत. मात्र भाजप सरकारने को-एज्युकेशनच्या नावाखाली लातूरचे महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा घाट घातला आहे. त्याला लातुरातील विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असून, ‘शैक्षणिक बंद’चा इशारा दिला आहे. महिला कॉलेज बंद पाडून ‘बेटी कैसे पढेगी’ असा संतप्त सवाल संघटनांनी केला आहे. या शैक्षणिक हबमुळे २५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने लातूरला शासकीय महिला तंत्रनिकेतन सुरू केले. या आठ वर्षांच्या कालावधीत महिला तंत्रनिकेतनने तंत्रशिक्षणात गुणवत्ता प्रस्थापित केली. मात्र पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा देऊन शासनाने महिला तंत्रनिकेतनमध्ये को-एज्युकेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र महिला महाविद्यालयाऐवजी मुला-मुलींच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महिला तंत्रनिकेतनचे रुपांतर होणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून को-एज्युकेशन करण्याचा निर्णय शासनाचा आहे. त्याला लातुरातील विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी विरोध केला असून, शैक्षणिक बंदचा इशारा दिला आहे. स्वतंत्र महिला तंत्रनिकेतन बंद करून स्त्री शिक्षणाबाबतची उदासीनता असल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून केला जात आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ४०० जागा शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये होत्या. आता को-एज्युकेशन होत असल्यामुळे त्यात गुणवत्तेने प्रवेश मिळून मुलींच्या प्रवेशाचा टक्का कमी होणार आहे. शिवाय, स्वतंत्र मुलींचे तंत्रनिकेतन असल्यामुळे प्रवेशासाठी पालकांची पहिली पसंती शासकीय तंत्रनिकेतनला असायची. मात्र आता ती सोयच राहणार नाही. (प्रतिनिधी)
कॉलेज बंद करोगे तो बेटी कैसे पढेगी !
By admin | Updated: December 27, 2016 23:58 IST