टेंभूर्णी : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आता प्रत्येक गावात आयसीयू (अतिदक्षता) सुविधा मिळणार आहे. ग्रामीण भागातील रूग्णांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने टेंभूर्णी येथील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील रुग्णांसाठी एक विशेष रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेमध्ये गरोदर मातांसाठी प्रसुतीची सुविधा, आयसीयू सुविधा, ईसीजी अशा प्रकारच्या सर्व सुविधा या रुग्णवाहिकेमध्ये उपलब्ध असल्याचे पुणे येथील आरोग्य केअर सेंटरचे पुराणिक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच सदरील आरोग्य सेवा ही अत्यावश्यक रुग्णांसाठी असून या रुग्णवाहिकेमध्ये २४ तास डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत.एखाद्या खेडेगावात साप चावणे, हृदयविकाराचा झटका येणे, महिलांची प्रसुती अशा प्रकारच्या घटना घडतात. अशा वेळेस सदरील रुग्णांनी पुणे येथील आरोग्य क्रिटिकल केअर सेंटरला १०८ या टोल मोफत क्रमांकावर फोन करावा व तेथे आजार व ठिकाणाबाबत माहिती द्यावी. त्यानंतर आरोग्य केअर सेंटर येथून संबंधित ठिकाणी नियुक्त केलेल्या डॉक्टर व रुग्णवाहिका चालकांना माहिती देण्यात येते.गावाचे अंतर कापण्यासाठी रुग्णवाहिकेला जितका वेळ लागेल, तेवढ्याच वेळात रुग्णवाहिका रुग्णांच्या घरी पोहोचते. त्यानंतर लगेच उपचार सुरू होतो. ग्रामीण भागात तातडीची सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना काही वेळेस आपली जीवही गमवावा लागतो. ही आयसीयू रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार असून, रुग्णाचा जीव वाचविण्यास मदत होणार आहे. रुग्णवाहिकेसह डॉक्टरची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातूनही या सेवेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
प्रत्येक गावात आयसीयूची सुविधा
By admin | Updated: July 8, 2014 01:01 IST