उस्मानाबाद : समयोजनानंतरही जिल्हाभरातून सुमारे १५० च्या आसपास शिक्षक, मुख्याध्यापक अतिरिक्त झाले होते. त्यांच्या समायोजनांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या शिक्षकांना बाहेरच्या जिल्ह्यात पाठविण्याशिवाय शिक्षण विभागासमोर दुसरा पर्याय नव्हता. असे असतानाच १७ मे रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अशा गुरुजींसाठी दिलासादायक निर्यण झाला आहे. आता पहिली ते सातवी वर्गातील दीडशे विद्यार्थ्यांना एक मुख्याध्यापक दिला जाणार आहे. त्यामुळे जवळपास शंभर शिक्षकांवरील अतिरिक्ततेचे गंडातर टळणार आहे. इंग्रजी शाळांचे जाळे दिवसेंदिवस ग्रामीण भागातही विस्तारु लागले आहे. त्यामुळे वर्षागणिक विद्यार्थीसंख्या कमी होवू लागली असून, शिक्षकही त्याचप्रमाणात अतिरिक्त होवू लागले आहेत. यावेळी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) गुरुजींची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाभरातून सुमारे २६४ वर गुरुजी अतिरिक्त ठरले होते. या गुरुजींचे रिक्त जागांवर समायोजन करुनही सुमारे दीडशे शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठविण्याची वेळ आली होती. त्यामुळे गुरुजीही चांगलेच धास्तावले होते. दरम्यान, यासंदर्भात शिक्षण आयुक्त आणि शिक्षण उपसंचालक यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर बराचकाळ चर्चा झाली. त्यानंतर शिक्षकांसाठी दिलादायक निर्णय झाला आहे. पूर्वी पहिली ते पाचवी या वर्गात दीडशे किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्यास एक मुख्याध्यापक दिला जात असे. मात्र आता पहिली ते सातवी या वर्गांची पटसंख्या दीडशेपेक्षा जास्त असल्यास एक मुख्याध्यापक दिला जाणार आहे. त्यामुळे आता अतिरिक्त १४५ पैकी १०० मुख्याध्यापकांना जिल्ह्यात राहता येणार आहे. या निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न बर्यापैकी सुटला आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेची ४ थी पर्यंत शाळा आहे, तेथे पाचवीचा तर ज्या ठिकाणी सातवीपर्यंत शाळा आहे तेथे आठवीचा वर्ग सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे पूर्वी हे वर्ग सुरु करण्यासाठी किमान २० विद्यार्थी संख्या असणे बंधनकारक होते. परंतु यावेळी शासनाने सदरील अटही काढून टाकली आहे. त्यामुळे आता कितीही पटसंख्या असली आगामी शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. मात्र शिक्षक नियुक्ती पुढच्या वर्षी केली जाणार आहे.
शंभरावर गुरुजींवरील अतिरिक्ततेचे गंडांतर टळले
By admin | Updated: May 18, 2014 00:49 IST