जालना : व्यापारी दुकान उघडत असताना त्यांची दीड लाख रुपये असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली.महात्मा फुले मार्केटमध्ये गाळा क्रमांक ४२ येथे अजित दत्तात्रय निरखी यांचे ठोक विक्रीचे दुकान आहे. निरखी हे सकाळी सोबत दीड लाख रुपये रोख असलेली पिशवी घेऊन दुकान उघडण्यासाठी आले. पिशवी खाली ठेवून दुकानाच्या एका शटरचे कुलूप उघडणार तोच, चोरट्याने निरखी यांची पैशांची पिशवी लंपास केली. या प्रकारानंतर निरखी यांनी परिसरात चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे परिसरातील व्यापाऱ्यांनीही त्यांना मदत केली. परंतु तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. याप्रकरणी निरखी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार साळुंके हे करीत आहेत. दरम्यान, शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आज ही घटना बाजारपेठ भागात घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली.
दीड लाख रुपये भरदिवसा लांबविले
By admin | Updated: May 19, 2015 00:46 IST