नवी दिल्ली : नोकरी देणाऱ्या एजन्सीच्या नावाखाली मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पर्दाफाश केला असून, यात अडकलेल्या एकाला गजाआड केले आहे.
एनआयए प्रवक्त्याने सांगितले की, झारखंडच्या खुंटी येथील रहिवासी गोपाल ओरांव (२८) याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या पन्नालाल महतो याच्या तो जवळचा आहे व मानवी तस्करीच्या टोळीत सक्रिय आहे. मागील वर्षी १९ जुलै रोजी खुंटीमध्ये आयपीसी व बंधुआ मजूर प्रथा (निर्मूलन) अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. एनआयएने चार मार्च रोजी याबाबत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती.
महतो व त्याची पत्नी सुनीता देवी दिल्लीमध्ये तीन प्लेसमेंट एजन्सीच्या नावावर हे रॅकेट चालवत होते. एनआयए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी दिल्ली व परिसरातील राज्यांत नोकरी देण्याच्या बहाण्याने झारखंडमधून गरीब व अल्पवयीन मुले-मुलींना आणत होते; परंतु त्यांना पैसा देत नव्हते. ओरांव हा सर्वांना या कामात मदत करीत होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, झारखंडच्या पाकुड, साहिबगंज, गुमला व खुंटी या चार जिल्ह्यांतील टोळीच्या निवासी ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यात गुन्ह्याशी संबंधित अनेक कागदपत्रे, रेल्वे तिकिटे व मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.