श्रीक्षेत्र माहूर : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व कर्मचाऱ्यांनी खात्यात्या इमारतीत राहावे, अन्यथा त्यांच्या पगारातून घरभाडे कपात करण्यात येईल, असे आदेश वरिष्ठांनी बजावले आहे. इमारत शेवटची घटिका मोजत असल्याने येथे राहायचे कसे? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.माहूर वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत वनपाल २३ वनरक्षक, २ वॉचमन तर २१ वनमजूर कार्यरत आहे. एकूण ५३ कर्मचारी या कार्यालयाअंतर्गत असून शहरात असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालयास ५ एकर जागा पूर्वीपासून उपलब्ध आहे. या जागेचा ७/१२ अद्याप वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नावे झालेला नाही. पी.आर. कार्ड बनविण्याची तसदी अद्याप वन विभगाने घेतलेली नाही. या कार्यालयाच्या जागेत सन १९५९ साली शासनाने कार्यालय भांडार गृह व दोन कर्मचारी निवासस्थाने बांधली परंतु देखभाल दुरुस्ती व कलरिंग अभावी ही बांधकामे जीर्ण झाली आहेत. दरवर्षी कलर व दुरुस्तीसाठी आलेला निधी कुठे वापरला जातो हे न उलगडणारे कोडे आहे. छतावर कौलारू व पाट्या लावून बनविण्यात आलेल्या भिंती जोराची लाथ मारल्यास पडण्याच्या बेतात आहेत. १७ मे १४ रोजी उपवन संरक्षक एस. डी. दोडल यांनी माहूर येथे भेट दिली असता नवीन कार्यालय, विश्रामगृह कर्मचारी निवासस्थाने,संरक्षण भिंत बांधण्याबाबत निवेदने देण्यात आली. यावेळी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आय. भंडारे यांना आदेश देवून जे कर्मचारी या निवासस्थानात राहणार नाहीत. त्यांच्या वेतनातून घरभाडे वसूल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आय. भंडारे यांनी माहूर वनपाल एस. डी. ताडपेल्लीवार वनपाल झेड. एम. पवार, पाचोंदा वनरक्षक माहूर एस. आर. देशमुख, वनरक्षक पाचोंदा के. एम. बर्लेवाड, वनरक्षक वानोळा तांडा व्ही. पी. सारगे तसेच वनरक्षक पवनाळा डी. एम. सोनकांबळे यांचे चालू महिन्यांपासून नेमून दिलेल्या ठिकाणी राहत नसल्याने त्यांच्या वेतनातून घरभाडे कपात होणार आहे.एकीकडे जंगलाचे संरक्षण करताना कर्मचाऱ्यांना गुन्हेगार व जंगली जनावरांशी दोन हात करावे लागतात. वाहन व हत्यारे नसल्याने जीव धोक्यात तर या निवासस्थानात राहून परिवारांचे जीव धोक्यात त्यामुळे येथील कर्मचारी द्विधा मन:स्थितीत असून वन विभागच्या वरिष्ठांनी आदेश मागे घेवून येथील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने कार्यालय विश्रामगृह बगीचा संरक्षक भिंतीची तत्काळ बांधकाम सुरू करुन वाहन व हत्यारे तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी वनप्रेमीतून होत आहे. (वार्ताहर)लाथ मारली तरीही पडणार निवासस्थानेपावसाळ्यात पूर्ण निवासस्थाने चाळणीसारखी गळत असल्याने या घरात राहणार कोण? त्यातल्या त्यात पाच एकरच्या परिसरात संरक्षक भिंत नसल्याने जंगली व गावठी मोकाट जनावरांचा सुळसुळाट तर सर्पांचा रात्रं-दिवस मुक्त वावर असल्याने चोवीस तास परिवाराची चिंता ठेवण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे बेहतर म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांनी केंव्हाच ही निवासस्थाने सोडली आहेत. या निवासस्थानांची अवस्था भूत बंगल्यासारखी झाली. चोरीचा पकडलेली लाकूड वाहने व आरोपींना ठेवण्यासाठी येथे कुठलीच व्यवस्था नाही तर येथील विश्रामगृहात सुविधांचा अभाव तर भांडारगृहात असलेल्या कार्यालयातील महत्वपूर्ण कागदपत्रे संगणक व इतर साहित्य रामभरोसे आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार निवासस्थान मंजूर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्या निवासस्थानात राहावेच लागेल अन्यथा चालू महिन्याच्या वेतनातून नियमानुसार घरभाडे कपात करण्यात येईल.एस.आय. भंडारेवन परिक्षेत्र अधिकारी
जीर्ण घरात राहायचे कसे?
By admin | Updated: July 11, 2014 01:01 IST