बीड : पुस्तक विक्री, लॅपटॉप दुरुस्ती व सेल्समन असल्याची बतावणी करून रेकी करीत रात्री घरफोड्या करणाऱ्या दोन अल्पवयीन युवकांनी पोलिसांनी झोप उडविली आहे. हे दोघेही येथील बालसुधारगृहातून पळालेले आहेत, हे विशेष.दोघांपैकी एकावर चोरीचा गुन्हा नोंद असून, तो लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दुसरा अनाथ असल्याने सुधारगृहात दाखल झाला होता. या दोघांची येथेच ओळख झाली. महिनाभरापूर्वी दोघांनीही पलायन केले. एकाचे वय १७, तर दुसऱ्याचे १६ वर्षे असे आहे. सुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुस्तक विक्री, लॅपटॉप दुरुस्तीचा बहाणा करीत घरांची रेकी केली. पती-पत्नी नोकरीला असल्यास दुपारी, अन्यथा रात्रीच्या वेळी बंद घर पाहून त्यांनी हात साफ केल्याचा पोलिसांचा संशय आहे.गेल्या काही दिवसांत झालेल्या गुन्ह्यांत या दोघांचा हात असावा, असा पोलिसांचा अंदाज असून, त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर जारी करण्यात आली आहेत.या दोघांबद्दल माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी केले. (प्रतिनिधी)
सेल्समनच्या बहाण्याने घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 23:04 IST