लातूर : समाजाच्या ज्ञानाचा पाया ग्रंथ आहे़ तर दुसरा पाया संस्कृती आहे़ त्यामुळे ज्या घरी ग्रंथ नाहीत, त्या घरी सौख्य नाही़ प्रत्येक घरात जसे देवघर असते, तसे पुस्तकांचा ठेवा असायला हवा़ यातूनच ज्ञानाचा पाया मजबूत होईल, असे मत माजी खा़डॉ़जनार्दन वाघमारे यांनी येथे व्यक्त केले़जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व नॅशनल बुक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ महोत्सव सुरु झाला आहे़ या महोत्सवानिमित्त सोमवारी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पार्क ते दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली़ यावेळी ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर होत्या़ मंचावर जि़प़ उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महिला व बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, जि़प़चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, डी़एऩ केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ जनार्दन वाघमारे म्हणाले, ग्रंथ चळवळीतून वाचक वाढणार आहे़ ग्रंथ चळवळ ही ज्ञानासाठी आहे़ त्यामुळे प्रत्येक शाळेत ग्रंथालय असायला हवेच़ ग्रंथातूनच ज्ञान मिळते़ समाजाच्या ज्ञानाचा ग्रंथच पाया आहे़ तर आपली संस्कृती दुसरा पाया आहे़ संस्कृतीचे जतन करण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक आहे, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे यांनी केले़ (प्रतिनिधी)
ज्या घरात ग्रंथ नाही, त्या घराला सौख्य नाही
By admin | Updated: March 31, 2015 00:38 IST