लोहारा : तालुक्यातील भोसगा येथील एका घराला अचानक आग लागून तब्बल ८० हजारांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी घडली.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भोसगा येथील दत्तात्रय इसप्पा एकुंडे यांच्या घराला गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, उन्हाची तीव्रता आणि जोराचे वारे असल्याने ही आग काही केल्या आटोक्यात आली नाही. त्यामुळे उमरगा येथून आग्नीशामक दलाची गाडी पाचरण करण्यात आली. त्यानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, लोकमंगल साखर कारखान्याची आग्नीशामक दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली होती. या घटनेमध्ये घरातील धान्य, कपडे, महत्वाची कागदपत्रे व अन्य संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये तब्बल ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार ज्योती चौहान, मंडळ अधिकारी ए. जी. कुलकर्णी, तलाठी जगदिश लांडगे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देवून पाहणी केली. घटनेमध्ये एकुंडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच मुकेश सोनकांबळे यांनी केली. (वार्ताहर)
घराला आग; ऐंशी हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2015 00:49 IST