वाळूज महानगर : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा ग्रामपंचायतीने गावातील गरीब नागरिकांना सोलार हिटरच्या मदतीने स्नान करण्यासाठी मोफत गरम पाणी देण्याच्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. आयएसओ मानांकन तसेच राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा- गंगापूर नेहरी ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या ग्रामपंचायतीने उत्कृष्टरीत्या राबवून संपूर्ण राज्याचे लक्ष या गावाने आपल्याकडे वेधून घेतले आहे. गावात नियमितपणे करांचा भरणा करणाऱ्या नागरिकांना मोफत दळण, आगाऊ कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना संसरोपयोगी साहित्याची भेट, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर, एटीएम कार्डद्वारे नाममात्र दरात शुद्ध पाणीपुरवठा, दारूबंदी, संपर्ण गावात गुटखाबंदी, कचऱ्याचे व्यवस्थानपन करून खत निर्मिती, ग्रामपंचायतीच्या मालकी हक्कात महिलांच्या नावाचा समावेश करणे, मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार, प्रत्येक आठवड्यात गरीब नागरिकांसाठी गावपंगत इत्यादी उपक्रम पाटोदा ग्रामपंचायतीने यशस्वीपणे राबविले आहेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून यशस्वीपणे राबवून अल्पावधीतच गावाचा चेहरा- मोहरा बदलून टाकला आहे. या ग्रामपंचायतीला तालुका, जिल्हा, मराठवाडा विभागीय तसेच राज्यस्तरावरील विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
पाटोदा येथे सोलार हिटरद्वारे गरम पाणी
By admin | Updated: December 1, 2014 01:26 IST