हिमायतनगर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे़ वसतिगृह बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे़ मात्र केवळ जागा मिळत नसल्याने हिमायतनगरात आदिवासी वसतिगृह भाड्याच्या इमारतीत सुरु आहे़ जिल्ह्यात किनवट, माहूर, हिमायतनगर तालुक्यात आदिवासी समाज वास्तव्यास आहे़ या समाजाचा विकास व्हावा, त्यांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत हा उदात्त हेतू समोर ठेवून केंद्र व राज्य स्तरावर शासन विविध योजना राबविते़ याअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविले जातात़ हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासनाने वसतिगृह मंजूर केलेले आहे़ किनवट येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून यावर नियंत्रण ठेवण्यात येते़ हिमायतनगरात वसतिगृह बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे़ परंतु त्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने इमारत बांधायची कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो़ तात्पूरती व्यवस्था म्हणून मुलांचे वसतिगृह बोरगडी रस्त्यावर तर मुलींचे वसतिगृह शहरातील जनता कॉलनीत भाड्याच्या इमारतीत आहे़ १०० मुले व ७५ मुलींची विद्यार्थीसंख्या येथे मंजूर आहे़ वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै आह़े मुलांच्या वसतिगृहात ४८ मुले जूने आहेत़ नवीन प्रवेशासाठी दोनशेवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत़ यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे़ प्राप्त अर्जापैकी गुणवत्तेच्या निकषावर विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया किनवट येथील प्रकल्प कार्यालयाकडून १५ आॅगस्टपर्यंत होणे अपेक्षित आहे़ शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत़ परंतु वसतिगृह प्रवेश पक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही़ त्यामुळे हिमायतनगर येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना निवासासाठी तात्पूरती व्यवस्था अन्यत्र करावी लागत आहे़आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासनस्तरावर लाखो रुपयांचा निधी आहे़ केवळ जागेअभावी विद्यार्थ्यांना भाड्याच्या इमारतीत अपुऱ्या जागेत रहावे लागत आहे़ हिमायतनगर ग्राम पंचायतीने वसतिगृह बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देवून हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढावा, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर) सुविधा वाढविण्यावर भर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शहरात वसतिगृह असून १०० मुले व ७५ मुलींची प्रवेशक्षमता आहे़ दोन्ही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहेत़ येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना टेबल, खूर्ची, पाठ्यपुस्तके, वह्या, कपडे व अन्य साहित्य पुरविले जाते़ जेवणाची व्यवस्थाही शासनाकडून केली जाते़ जागा नसल्याने हे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत सुरु आहे़ बांधकामासाठी जागा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना या सुविधा आणखी चांगल्या प्रकारे देणे शक्य होईल़ -दमकोंडकर, वसतिगृह अधीक्षक
वसतिगृहास जागा मिळेना
By admin | Updated: July 21, 2014 00:36 IST