जालना : शहरासह जिल्ह्यात होलिकोत्सव बुधवारी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी ठिकठिकाणी होळीचे पूजन करण्यात आले. जालना शहरातून सकाळी काढलेल्या रंगगाड्याने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी आबालवृद्ध रंगोत्सवात अक्षरश: न्हाऊन निघाले होते. यंदा दुष्काळामुळे जिल्हा प्रशासन, नगर पालिका तसेच अनेक सेवाभावी संस्थांनी पाणी बचतीचे संदेश देत कोरडी तसेच पर्यावरणपूरक होळी खेळण्याचे आवाहन केले होते. याला अनेकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान वाईट विचारांचे, वाईट प्रथांचे दहन करण्यासाठी होळी पेटविली जाते. शहरातील मामा चौकात मानाची होळी पेटवली जाते. गत ४० वर्षांपासून सहानी कुटुंबिय तसेच परिसरातील व्यापारी मिळूनही होळी साजरी करतात. बुधवारी सायंकाळी आ. अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होलिका पूजन करण्यात आले. यावेळी अंकुशराव राऊत, प्रा. आत्मानंद भक्त, नूर खान, रमेशचंद्र तवरावाला, विनीत साहनी, पोलिस निरीक्षक अनिल विभुते, संजय देठे, सुभाष देविदान, अजिंक्य महाराज देशमुख आदींची उपस्थिती होती. घनतृप्त हनुमान मंदिर, शनि मंदिर, चमन, संभाजी नगर, नूतन वसाहत आदी भागात सार्वनिक होलिकोत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासन व नगर पालिकेने पाणी बचतीचे आवाहन केले आहे. बुधवारी काढण्यात आलेल्या रंगगाड्यानिमित्त पाण्याचा अत्यल्प वापर करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात फुलांची उधळण करण्यात येऊन अनेकांनी ठेका धरला. फुले तसेच कोरड्या रंगांचा मुक्त वापर करण्यात आल्याचे रंगगाडा होलिकोत्सव समितीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. कादराबाद भागातील होलिकोत्सव समितीच्या वतीने सकाळी रंगगाडा काढण्यात आला. कादराबादसह परिसरातून रंगगाडा फिरवून नागरिकांनी रंगोत्सवाचा आनंद लुटला. या रंगगाड्याचीही जुनी परंपरा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रंगगाड्यासह ढोलताशांचा गजरही करण्यात आला. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
जालना जिल्ह्यात होलिकोत्सव उत्साहात
By admin | Updated: March 24, 2016 00:42 IST