तुळजापूर : शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वीजबिलासाठी, बँकेच्या कर्जवसुलीसाठी नोटीसा दिल्या जात आहेत़ या नोटीसींची आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावातच होळी करणार असल्याची माहिती आ़ बच्चू कडू यांनी दिली़शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा शुक्रवारी तुळजापूर शहरात आली़ या यात्रेचे तुळजापूरकरांनी जोरात स्वागत केले़ यानिमित्त आयोजित जनता दरबारात आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील, दिनकर दाबाडे, मयूर काकडे, रामजीवन बोंदर, महादेव खंडाळकर, नगरसेवक अमर मगर, राहूल खपले, अमर परमेश्वर यांच्यासह प्रहार संघटना, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, विधवा महिला, अपंग उपस्थित होते. आ. कडू म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने झाली आहेत़ अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे़ मोदी सरकार १ लाख कोटी बुलेट ट्रेनवर खर्च करत आहे आणि आठ कोटी शेतकऱ्यांना ३० हजार कोटी द्यायला तयार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला़ (वार्ताहर)
मोदींच्या गावात करणार नोटीसीची होळी
By admin | Updated: April 15, 2017 21:32 IST