औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञ कार्यालयात काम करणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यास फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १६ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास स्नेहनगर येथील शासकीय निवासस्थान परिसरात घडली. वरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ विजय काशीनाथ शेवरे (४६) आणि वास्तूशास्त्र आरेखक गणेश निवृत्ती वसईकर (४०, दोघे. रा. स्नेहनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक उपमुख्य वास्तूशास्त्रज्ञांचे कार्यालय शहरात आहे. या कार्यालयात अजय रमेश मोरे हे वास्तूशास्त्र आरेखक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी हे त्यांचे वरिष्ठ आहेत. त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम मोरे यांनी करावे, यासाठी ते सतत त्यांच्यावर दबाव आणत असत. मात्र, त्या धमकीला न जुमानता मोरे हे नेहमीप्रमाणे आपली ड्यूटी करीत असत. १६ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोरे हे स्नेहनगर येथे असताना या दोघांनी त्यांना फायटरने मारहाण केली. याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.