औरंगाबाद : रात्री उशिरा घरी आल्यानंतर दार उघड बाई दार उघड... असे म्हणणाऱ्या पतीला ‘तुम्ही दारू पिऊन येता’ असे म्हणत पत्नीने घरात घेण्यास नकार दिला. त्यावरून पती-पत्नीत वाद झाला. तेव्हा संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या नाकावर सिमेंटच्या गट्टूने ठोसा मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना काल मध्यरात्री विद्युत कॉलनीत घडली.फिर्यादी सचिन शिवाजी पिंचोळे (३०) हा रिक्षा ड्रायव्हर आहे. काल रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तोे रिक्षा घेऊन घरी आला. त्याने घराचा दरवाजा ठोठावला. तेव्हा पत्नी प्रियंका (२५) घरातून बाहेर आली. सचिनने घरात जाण्याचा प्रयत्न केला असता प्रियंकाने त्याला अडविले. ‘तुम्हाला आज मी घरात घेणार नाही, तुम्ही दारू पिऊन घरी येता’ असे म्हणत तिने पतीला घरात घेण्यास नकार दिला. तिने घराचा दरवाजा पुन्हा आतून बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सचिनने बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यातून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात प्रियंकाने पती सचिनला उलटसुलट बोलत बाजूलाच पडलेला सिमेंटचा गट्टू उचलला आणि त्याच्या नाकावर गट्टूने जोरदार ठोसा लगावला. या ठोशामुळे सचिनचे नाक फुटले. तो जखमी झाला. नंतर प्रियंकाने त्याला बाहेर ढकलून देऊन घराचा दरवाजा बंद केला. या प्रकारानंतर सचिनने सरळ बेगमपुरा ठाणे गाठले आणि पत्नीविरुद्ध फिर्याद दिली.
पत्नीने पतीला झोडपले
By admin | Updated: August 29, 2014 01:32 IST