हिंगोली : अवैध सावकारीच्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या पथकाने १९ आॅगस्ट रोजी सकाळी शहरातील पेन्शनपुरा भागातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत एकाच कुटुंबातील महिलेसह दोघांजवळील दस्तावेज जप्त करण्यात आले असून चौकशीअंती पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक डी.एस.हराळ यांनी दिली.हिंगोली शहरात अवैध सावकारी सुरू असल्याबाबत तीन लेखी तक्रारी प्राप्त झाल्याने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार एक विशेष पथक स्थापन केले. या पथकाने मंगळवारी सकाळी पेन्शनपुरा भागातील पंडीतराव घुगे यांच्यावर घरावर छापा टाकला. या कारवाईत विमल पंडीतराव घुगे, तुषार पंडीतराव घुगे या दोघांनी लोकांकडून लिहून घेतलेली कागदपत्रे, १५ रजिस्ट्रीचे दस्तावेज, १९ डायऱ्या-वह्या जप्त करण्यात आल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोघांविरूध्द आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्णत आली आहे. पथकात सहाय्यक निबंधक डी.एस.हराळ, चौकशी अधिकारी तथा सहकार अधिकारी बी.डी.पठाडे, सहाय्यक सहकार अधिकारी डी.एल.डुकरे, बी.एम.बिरकुल, डी.डी.सावळकर, एम.ए.भोयर यांच्यासह ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या पथकाने अवैध सावकारीच्या संदर्भातील मूळ दस्तावेज पंचासमक्ष जप्त करून तपासणीसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात नेले आहेत. या प्रकरणातील साक्षीदारांचे जवाब नोंदवून व चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पुर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा व हिंगोली तालुक्यात नवीन सावकारी कायद्यानुसार आतापर्यंत पाच ठिकाणी छापे टाकून अवैध सावकारांकडील मूळ रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहे. परंतू त्याची चौकशी पुर्ण झालेली नसल्याने एकाही प्रकरणात अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. (प्रतिनिधी)
हिंगोलीत दोन सावकारांच्या घरावर छापा
By admin | Updated: August 20, 2014 00:22 IST