हिंगोली : अनुसूचित जमातीच्या आरक्षणात यापुढे इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नका, या व इतर मागण्यांसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजीने मोर्चेकऱ्यांनी शहर दणाणून सोडले तर पारंपरिक वेशभूषा व घोषवाक्यांची फलकेही आदिवासींच्या जीवन पद्धतीकडे लक्ष वेधत होते.जिल्हा परिषदेजवळून निघालेला हा मोर्चा गांधी रोडमार्गे जिल्हा कचेरीवर जाऊन धडकला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषेसह तिरकमटा, वाघूर, जाळे आदी साहित्य घेऊनही अनेकजण सहभागी झाले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडला होता. जवळपास १४ ते १५ हजार नागरिक यात सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, काही प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तर मान्यवरांनी जमलेल्या समुदायास मार्गदर्शनही केले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या मागण्यांच्या निवेदनात म्हटले, अनुसूचित जमातीत सहभागी होण्यासाठी जवळपास ५0 जाती प्रयत्नशिल आहेत. मात्र अनुसूचित जमातीत इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, १८ मे २०१३ या शासन परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करावी, आदिवासी बांधवांना घरकुल वाटप करावे, ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतील लोकसंख्येची अट रद्द करून लोकसंख्येनुसार निधी वाटप करावा, पारधी पॅकेज योजनेची अंमलबजावणी करावी, एस.टी.चे आरक्षण सध्या ७ टक्के आहे, ते लोकसंख्येच्या प्रमाणात ११ टक्के करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर राज्याध्यक्ष डॉ. संतोष टारफे, समाजकल्याण सभापती मधुकर कुरुडे, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाचपुते, कृष्णा पिंपरे, शंकर शेळके, मारोती बेले, संजय काळे, सुधीर बोलके, धनंजय ढाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी माजी आ.भीमराव केराम, माजी जि.प.अध्यक्षा सुलोचना काळे, जनाबाई डुडुळे, रामराव वाघडव, अनिता खुडे यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.(जिल्हा प्रतिनिधी)पारंपरिक वेशभूषेने लक्ष वेधले सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मोर्चात सहभाग नोंदवून आपल्या समाजाची मागणी रेटण्याचा प्रयत्न केलाआदिवासी समाजाच्या पारंपरिक वेशभूषेसह, ढोल-ताशावर नृत्य, शिकारीची शस्त्रे व साहित्यही आणले होते मोर्चेकऱ्यांनीआदिवासी समाजाच्या मागण्यांवर विचार न केल्यास लढा तीव्र करण्याचा व्यक्त केला निर्धार
आदिवासींच्या मोर्चाने हिंगोली दणाणली
By admin | Updated: August 1, 2014 00:31 IST