चापानेर : शिऊर बंगला ते भराडी या राज्य महामार्गावर नव्याने लावण्यात आलेले दिशादर्शक, गावदर्शक फलक हे चुकीचे लावले असून, ज्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नाही. ती गावे दाखवली आहेत. तर काही गावांची नावे हिंदी भाषिक टाकल्याने वाहनचालक संभ्रमात पडत आहेत. हे चुकीचे फलक बदलून नव्याने लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नव्याने झालेल्या शिऊर बंगला ते भराडी या ११० किलोमीटर अंतराच्या राज्यमहामार्ग क्रमांक ५१ वर ठिकठिकाणी गावांचे फलक बसविण्यात आले आहेत. मात्र, या फलकांवर शिरसगांव येथे खुलताबाद ३५ किलोमीटर दाखविले आहे. मात्र, शिरसगांव येथून खुलताबादकडे जाण्यासाठी मार्गच नाही. त्यामुळे वाहनधारकांची दिशाभूल होत आहे. कंत्राटदारास वाटेल त्या पद्धतीने फलक बसविले असल्याचे निदर्शनास येत असून त्यावर कुणाही स्थानिक अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचे स्पष्ट होत आहे. कंत्राटदार परराज्यातील असल्यामुळे त्याने हिंदी भाषेत मराठी गावांची नावे लिहिल्याने गफलत होत आहे. जवळी ऐवजी जवहाली, गव्हालीऐवजी गवहाली अशी नावे दिली आहेत. बनशेंद्रा येथे टाऊन सेंटर, चापानेर येथे दरेकर वस्ती बाण करून दाखविले आहेत. ज्या गावांची नावे दाखवायला पाहिजे ती न दाखवता भलतीच नावे टाकली आहेत. यामुळे या रस्त्याने प्रथमच जात असलेले वाहनधारक संभ्रमात पडत असून चुकीच्या दिशेने जात आहेत. यामुळे वेळ व पैसा दोन्हींचा अपव्यय होत आहे.
चौकट
पंचक्रोशीत नसलेल्या गावाचा बोर्ड
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टाकळी लव्हाळी फाट्यावर औरंगपूर नावाचा बोर्ड लावला आहे. या नावाचे गावच पंचक्रोशीत नाही. या फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा शिवना टाकळी मध्यम प्रकल्प आहे. तो फलकावर दाखविलेला नाही. चापानेर येथून एका मोठ्या फलकावर १४ किलोमीटर अंतरावर कन्नड दाखवले आहे. तर त्याच फलकाच्या तीन फूट अंतरावरील दगडी फलकावर १५ किलोमीटर अंतर दाखविले आहे.
परराज्यातील कंत्राटदार व कर्मचारी
या महामार्गाचे काम परराज्यातील कंत्राटदार व परराज्यातीलच कर्मचारी करीत असल्याने त्यांनी चुकीची नावे फलकावर टाकली आहेत. तसेच नको ती नावे प्रकाशझोतात आणली आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना आपण चुकीच्या मार्गावर तर नाही ना असा प्रश्न पडत आहे.
फोटो : १) शिरसगांव येथे लावलेला फलक २) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी लव्हाळी फाट्यावर औरंगपूर नावाचा फलक लावला असून हे गाव पंचक्रोशीत नाही.