पिशोर : भारंबा तांडा येथील एका वृद्धाला सर्पदंश झाल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विष चढू लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी घाटीत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पिशोर रुग्णालयाची रुग्णवाहिका आजारी असल्याने खाजगी वाहनाला विनवण्या करण्यात आल्या; परंतु सर्वांनी नकार दिल्याने वृद्धाने तेथेच प्राण सोडला. मदतीची हाक देऊनसुद्धा कुण्या गाडीवानास पाझर न फुटल्याने माणुसकीचाच अंत झाल्याची चर्चा गावात होती.भारंबा तांडा येथील गोविंद मोतीराम राठोड या ७० वर्षीय वृद्धाला सर्पदंश झाल्याने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रतिभूषण गडवाल यांनी प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी घाटीत हलविण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने नातेवाईक खाजगी वाहन बघायला गेले. चार वाहने उभी असताना कुणीही जाण्यास तयार नव्हते. गावातील तरुण किशोर जाधव व अरुण जाधव यांनी चालकांच्या खूप विनवण्या केल्या. मात्र पाषाणहृदयी चालकांना माणुसकीचा पाझर फुटला नाही.नातेवाईकांचा सुमारे दीड तास गाडी शोधण्यात गेला. प्रकृती ढासळल्याने गोविंद राठोड यांना डॉ.गडवाल यांनी तपासून सायंकाळी ७ वाजेदरम्यान मृत घोषित केले. नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश ऐकून इतर रुग्ण व नागरिकसुद्धा हेलावले.
येथे ओशाळली माणुसकी...!
By admin | Updated: May 14, 2016 00:12 IST