लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया येत्या ७ आॅक्टोबर रोजी पार पडणार आहे. मात्र सोयाबीनचा हंगाम असल्याने मतदार सोयाबीन काढण्यासाठी रात्रंदिवस एक करीत असल्याने उमेदवारांना घरीच सकाळ- सायंकाळ घरी कोणीच भेटत नसल्याने उमेवारांनी नविन फंडा काढून शेतात जावून भेट घेण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची ही शिवारफेरी चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.निवडणूक म्हटले की, मतदारांना चांगलाच भाव येतो. त्यामुळे उमेदवार आप- आपल्या परिने मतदारांची मनधरणी करण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. मात्र पावसापासून वाचलेले सोयाबीन कापून टाकण्यामध्ये मतदार उमेदवारांच्या मनधरणीला अजिबात बळी पडत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत सोयाबीन काढणीचा हंगाम एवढा जोरात सुरु आहे की, मतदार सकाळी सूर्य निघण्याअगोदर शेतात आणि सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर घरी अशी स्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनाही प्रचार करावा तरी कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.काही उमेदवार मात्र नवीन शक्कल लढवित याला त्याला भेटण्यास आल्याचे निमित्त करुन आपण निवडणुकीत उभा असल्याचे हळूच सांगत आहेत. मतदार उमेदवारांच्या समाधानासाठी होकार देत पुन्हा काही क्षण विसावा घेऊन पुन्हा सोयाबीन काढणीच्या कामाला लागत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांची पुरती हेळसांडच होत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही गावातील मतदारांना तर उमेदवार कोण आहे? याचाही अजून ताळ मेळ नाही. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी तरी मतदार गावात राहतील किंवा नाही? याची चिंता उमेदवारांना चांगलीच भेडसावत आहे.
म्हणून उमेदवारांची होतेय शिवारफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:45 IST