नांदेड : नमस्कार मॅडम, रामराम सर म्हणत विद्यार्थ्यांचा पालकांशी शाळांमधील पालकसभांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लक्षवेधी नमस्काराच्या औचित्याने पालकसभा आयोजित केल्या होत्या. त्याक्षणी हे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी, सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुडे, अशोक देवकरे यांनी पालकसभांना भेटी दिल्या.जिल्ह्यातील सर्व शाळांना २१ जून रोजी पालकसभा घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते. पटनोंदणी अभियान, विद्यार्थी विकासासाठी चर्चा व लक्षवेधी नमस्कार या विषयावर चर्चा व करावयाच्या कार्यवाहीबाबत ठरविण्यात आले. बहुतांश शाळांमध्ये हा उपक्रम सकाळी घेण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत संदेश देवून पालकांना बोलावण्यात आले. शाळेत आल्यावर त्यांचे स्वागत करुन वर्गनिहाय बसविण्यात आले. वर्ग शिक्षक यांच्याशी चर्चा झाल्यावर एकत्रितरित्या मार्गदर्शन करण्यात आले. शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी याबाबत पुढाकार घेतला.नमस्कार काका, नमस्कार ताई, नमस्कार मामा म्हणत मुले शाळेत आली. गावागावात हेच चित्र पहावयास मिळत होते. पालकांनी दिलेला उर्त्स्फूत प्रतिसाद पाहता हा उपक्रम किती गरजेचा होता हे लक्षात येते. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी भोकर, मुदखेड तालुक्यातील वाकद, बारड, भोसी या शाळांना भेटी दिल्या. काही शाळांमध्ये फारच कल्पकतेने हा उपक्रम राबविला गेला. तर काही शाळांमध्ये याबाबत सूचना नसल्याचे आढळले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत पुनश्च सूचना करुन लक्षवेधी नमस्कार हा उपक्रम प्रभावीपणे अंमलात आणण्याविषयी सांगितले. शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यांनी तरोडा केंद्र, उपशिक्षणाधिकारी अशोक खुडे यांनी बिलोली तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, माहुरचे गटशिक्षणाधिकारी बनसोडे, नायगावचे प्रशांत दिग्रसकर, कंधारचे जी. आर. राठोड, लोहा येथील कुलकर्णी, नांदेडचे पी. के. सोने, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, सुचिता खल्लाळ यांनी चांगले नियोजन केल्याचे आढळले.प्राप्त झालेल्या अहवालात अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा बु., नांदेड तालुक्यातील नवीवाडी, वसरणी,कंधार तालुक्यातील फुलवळ, कंधार, लोहा, तालुक्यातील लोहा, सुनेगाव, देगलूर तालुक्यातील शिवणी आदी ठिकाणी चांगले समारंभ झाले. पालकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सगळ्या शाळा नमस्कारमध्ये झाल्या. पालकसभा करुन परतताना पालक आर्जवाने एकमेकांना नसम्कार करत होते. त्यास शिक्षकही चांगला प्रतिसाद देत होते. पालक सभांना बहुतांश ठिकाणी मातांनी हजेरी लावली. मुलांकडे लक्ष देण्याची व मुलांना संस्कारीत करण्याची आम्ही शपथ घेत आहोत, असेही सांगितले. नवीवाडी येथे राजू सूर्यवंशी, अंतिकाबाई बुक्तरे, सऱ्याबाई पिंगळे, इंदू दुधमल यांनी भावोत्कट उद्गार काढले. आमची लेकरं आता नुसते शिक्षणार नाहीत तर जिंदगी जगणे शिकतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
सर्व शाळांमध्ये झाला पालकांचा लक्षवेधी नमस्कार
By admin | Updated: June 23, 2014 00:01 IST