जालना: फडतारे बंधू यांच्या तबला-संवादिनीची जुगलबंदी, पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन, उस्ताद रईस खान यांच्या सतार वादन अन् पं. यादवराज फड यांची भैरवी... जालनेकरांसाठी रविवारची सायंकाळ एक संस्मरणीय ठरली. उस्ताद खान यांच्या सितारीतून अलगद अवतरलेल्या सूरांमुळे रसिकांना स्वर्गीय सुखाचा आनंद दिला. निमित्त होते ते ध्यास फाऊंडेशन आॅफ परफॉर्मिंग आर्टस््, कै. बाबूराव जाफराबादकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अप्पासाहेब जळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित संगीत समारोहाचे....कार्यक्रमाच्या सुरूवातीस पं. अप्पासाहेब जळगावकर यांचे मानसपुत्र सुरेश फडतारे यांनी हार्मोनियम तसेच हनुमंत फडतारे यांचे तबलावादन झाले. या दोघांनी आपल्या अप्रतिम कलाविष्कारातून राग यमन सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. यानंतर या दोघांनी तबल्याचे ताल अन् हार्मोनियमच्या सूरांचा अनोखा संगम घडवित नाट्यगीते, जुगलबंदी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.पं. सुधाकर चव्हाण यांनी सादर केलेलेल्या ‘जुगवा बीत गये’ ही पूरिया धनश्री रागावर आधारित बंदिश तर ‘विठ्ठला.. रे कंठ आळविता...’ या अभंगांमुळे कार्यक्रमात रंगत आणली. पं. चव्हाण यांना तबल्यावर सारंग भंडारी यांनी साथ दिली.उस्ताद रईस खान यांनी आपल्या सितारवादनातून राग देस सादर करत उपस्थितांना निर्झर झऱ्याचा आभास करविला. तबलावादक हनुमंत फडतारे आणि उस्ताद खान यांच्या जुगलबंदीमुळे रसिकांना स्वर्गीय सुरांचा अनुभव आला. शेवटच्या भागात पं. यादवराज फड यांनी शास्त्रीय संगीताचा कलाविष्कार सादर केला. त्यांनी सादर केलेली भैरवी विशेष दाद मिळवून गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रख्यात सतारवादक अतुल देशपांडे, शरद जाफराबादकर, अॅड. नरेंद्र जाफराबादकर, महेंद्र जाफराबादकर, डॉ. गिरीश पाकणीकर, डॉ. श्रीमंत मिसाळ, अश्विनी वासडीकर, डॉ. प्रतिभा भद्रे, डॉ. जयश्री प्रभू आदींसह संगीतप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)अंबेकर यांच्या हस्ते उद्घाटनजुना जालना भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या संगीत समारोहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्या हस्ते व मराठवाडा नाट्य परिषद, जालनाचे अध्यक्ष कुमार देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
सतारीतून अवतरले स्वर्गीय सूर...!
By admin | Updated: June 25, 2014 01:06 IST