उमरगा : शहरातील एका केबलचालकाकडे असलेल्या २००० ग्राहकांचा टीव्ही संच ‘सेट टॉप बॉक्स’अभावी बंद पडला असून, साधारणत: १० हजार नागरिकांना टीव्हीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रमापासून वंचित रहावे लागत आहे़उमरगा शहरात एक केबल चालक असून, त्यांच्याकडे साधारणत: २००० ग्राहक आहेत़ ३१ डिसेंबर पूर्वी ‘सेट टॉप बॉक्स’ बसविणे आवश्यक असल्याने केबलचालकांनी संबंधितांकडे आवश्यकतेनुसार ‘सेट टॉप बॉक्स’ची मागणी केली होती़ मात्र, अद्यापपर्यंत त्यांना अपेक्षित ‘सेट टॉप बॉक्स’चा पुरवठा झालेला नाही़ ‘सेट टॉप बॉक्स’बसविले नसल्याने सर्वच ग्राहकांचे टीव्ही संच बंद पडले आहेत़ याबाबत तहसीलदार उत्तम सबनीस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहरातील व तालुक्यातील केबलचालकांची यापूर्वीच बैठक घेवून आवश्यक ती माहिती देण्यात आली आहे़ शासनाच्या सूचनेनुसार ‘सेट टॉप बॉक्स’वेळेत बसवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ मुदत संपल्यानंतर ‘सेट टॉप बॉक्स’नसलेले टीव्ही संच बंद पडले असून, ग्राहकांना लवकरात लवकर ‘सेट टॉप बॉक्स’ उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना दिल्याचे सबनीस यांनी सांगितले़
दोन हजार ग्राहकांच्या मनोरंजनावर टाच
By admin | Updated: January 4, 2016 00:01 IST