जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे जिल्हा अक्षरश: होळपळून निघालेला आहे. तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून बुधवारी जालना शहराचा पारा ४३ अंशावर पोहोचला होता. सर्वाधिक तापमान मंठा तालुक्यात ४४ अंशांवर गेल्याची नोंद झाले आहे. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहे. सकाळी ९ वाजे पासूनच कडाक्याचे ऊन पडत आहे. दुपारी उन्हाचे चटके सहन करणे अशक्य होत आहे. त्यामुळे अनेकांनी विश्रांती घेणेच पसंत केल्याने बाजारात फारशी गर्दी दिसून आली नाही.आतापर्यंत जिल्ह्यात एप्रिल अखेर एक दिवस व मे च्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस अशा तीन दिवशी ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. मात्र सोमवार पासून वातावरणात बदल झाला. सोमवारी जालन्याचा पारा ४३ अंशांवर गेला होता. मंगळवारी तो ४२ अंशांवर आला होता. आणि बुधवारी पुन्हा ४३ अंशांवर गेल्याने जालनेकर अक्षरश: उन्हामुळे होळपळून गेले होते.बुधवारी सकाळपासूनच कडक ऊन जाणवू लागले. दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान उन्हाचा पारा ४३ अंशावर पोहोचला. ज्यांना कामानिमित्त बाहेर ये-जा करणे टाळणे अशक्य होते, त्यांनी रूमाल, गॉगल्सचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यापैकी मंठा तालुक्यात सर्वाधिक म्हणजेचे ४४ अंशांवर उन्हाचा पारा गेला होता. त्या पाठोपाठ जालना, बदनापूर ४३ अंबड, घनसावंगी, परतूर, जाफराबाद, भोकरदन या तालुक्यांत ४२ अंशांवर उन्हाचा पारा गेला होता.
जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम
By admin | Updated: May 21, 2015 00:28 IST