औरंगाबाद : अवयवदानाच्या चळवळीला मराठवाड्यात सुरुवात करणाऱ्या युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपण सुविधेची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या वैद्यकीय क्षेत्रात ही मोठी कामगिरी समजली जाते. यापुढे ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान करताना हृदय प्रत्यारोपणासाठी मुंबई किंवा इतर शहरांकडे जावे लागणार नाही.जानेवारीत युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये पहिले अवयवदान झाले होते. येथून या चळवळीला गती मिळाली. गेल्या १० महिन्यांत सहा ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे रुग्णांना जीवदान मिळाले. युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने या क्षेत्रातील प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘एनएबीएच’ मानांकन मिळविले आणि त्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची परवानगी देण्यात आली. अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सहायक, अद्ययावत सुविधा हे निकष ही परवानगी मिळताना तपासण्यात आले होते. हृदय प्रत्यारोपणासाठी हार्ट फेल्युअर क्लिनिकची सुरुवात या हॉस्पिटलमध्ये आठ महिन्यांपूर्वीच झाली. डॉ. आनंद देवधर, डॉ. शिरीष देशमुख, डॉ. आशिष देशपांडे व डॉ. राजकुमार घुमरे यांनी हार्ट फेल्युअर क्लिनिक समर्थपणे चालविले.हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. उन्मेष टाकळकर, सीईओ डॉ. अजय रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या क्षेत्रात हे रुग्णालय उतरले आहे. मराठवाड्यात जवळपास २५ हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. त्यांना या सुविधेचा लाभ होईल.
युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची परवानगी
By admin | Updated: October 27, 2016 00:59 IST