औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आभाळ ठेंगणे झाले. अव्वल स्थान मिळविण्यासाठी जिद्दीने केलेला अभ्यास व आई-वडिलांच्या अपार कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले, अशी भावना प्रत्येक यशवंतांच्या चेहऱ्यावर झळकत होती. ज्या क्षणासाठी आपण मागील वर्ष अहोरात्र अभ्यास केला तो सुवर्णक्षण आज उजाडला. खुद्द शिक्षणमंत्री आपल्या हातात पुष्पगुच्छ व बक्षीस देत संपूर्ण परिवाराची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत होते... तेव्हा प्रत्येक गुणवंत भारावून गेला होता. लोकमतने आमच्या गुणवत्तेचा सन्मान केला, त्यामुळे मिळालेली ऊर्जा आम्हाला आयुष्यभर उजळवत राहील, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या कौतुक सोहळ्याचे साक्षीदार ठरले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे. उल्लेखनीय म्हणजे बहुतांश गुणवंत विद्यार्थी सहपरिवार सहभागी झाल्याने या गौरव सोहळ्याला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते. आयआयटी प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज लोकमतच्या वतीने करण्यात आला. संपूर्ण लोकमत हॉल, विद्यार्थी व पालकांनी भरून गेला होता. सर्वप्रथम शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सर्व यशवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला सलाम केला. कौतुकात न्हाऊन निघालेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले होते. व्यासपीठावर प्रत्येक गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सन्मानाने बोलावले जात होते. शिक्षणमंत्री व कुलगुरूंसोबत त्यांचा एकत्रित फोटो काढला जात होता. आपल्या मुलाचा सत्कार होताना पाहून बहुतांश पालकही भारावून गेले होते. काही जण आपल्या मुलाच्या सत्काराचे फोटो लगेच व्हॉटस्अपवर शेअर करीत होते. या सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे औरंगाबाद शहरातूनच नव्हे तर फुलंब्री, पिशोरसारख्या ग्रामीण भागातूनही गुणवंत विद्यार्थी पालकांसमवेत आले होते. गरीब परिस्थितीवर मात करीत परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे यावेळी शिक्षणमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. लोकमतचे वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला यांनी प्रास्ताविक करताना आयआयटीत प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले. लोकमतने आमच्या गुणवत्तेचा केलेला सन्मान व मार्गदर्शन आम्हाला आयुष्यात पदोपदी प्रेरणादायी ठरले, अशा उत्स्फूर्त भावना यशवंतांनी व्यक्त केल्या.संपादक सुधीर महाजन, कार्यकारी संपादक चक्रधर दळवी, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, गुरुकुल क्लासेसचे संचालक निर्मल बिस्वाल आदींची उपस्थिती होती.उद्योजक बनून विकासाला हातभार लावाराजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, पूर्वी आयआयटी झाल्यानंतर देशात किंवा विदेशात नामांकित कंपनीत नोकरी करण्याकडे अभियंत्यांचा कल असे. मात्र, आता हे चित्रही बदलत आहे. आयआयटी झालेले अभियंते उद्योजक बनत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी)मध्ये औरंगाबादचा समावेश झाला आहे. यामुळे येत्या काळात औरंगाबाद, जालन्याचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. येथे औद्योगिक भरभराट होणार आहे. यामुळे येथे उद्योजकांना मोठी संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आयआयटी झाल्यानंतर औरंगाबादेत येऊन डीएमआयसीच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्र्यांनी केले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक बना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी आवाहन केले की, आयआयटी झाल्यानंतर नोकरी न करता संशोधक बना. कारण, आज देशाला संशोधक, वैज्ञानिकांची गरज आहे. आयआयटीमधून नोकरी करणारे अभियंते घडू नयेत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक निर्माण व्हावेत. कारण, आपल्या अभ्यासाचा देशालाही फायदा व्हायला पाहिजे. विद्यापीठातील प्राध्यापक हे संशोधक असतात. यामुळे त्यांची शिकविण्याची पद्धतही वेगळी असते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील शिक्षणाची पद्धत शिकून घ्यावी. स्वयंप्रेरणेने अभ्यास करावा. कपिल वैद्यचे शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन आयआयटीच्या जेईई (अॅडव्हान्स) परीक्षेत राज्यातून प्रथम आणि देशातून तेरावा आलेल्या अकोल्याच्या कपिल वैद्य याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले. त्यांनी कपिलला भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
गुणवंतांना लोकमतचा सलाम
By admin | Updated: June 22, 2014 00:52 IST