बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र, त्याआधीच भाजपाचा तंबू गाठलेल्या सहा सदस्यांनी ‘व्हिप’ डावलला होता. या सदस्यांचा अहवाल पक्षाने ‘हायकमांड’कडे पाठविला असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.२१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली होती. युती व आघाडीकडे समसमान २९ असे संख्याबळ होते. त्यामुळे निवडी अतिशय अटीतटीच्या होत्या. राष्ट्रवादीच्या वतीने घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेत धडक मारणाऱ्या सर्वच सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या सहा सदस्यांनी ‘व्हिप’ धडकावत युतीलाच साथ दिली. बापूराव धोंडे, उद्धव दरेकर, जयश्री मस्के, अर्चना आडसकर, कविता म्हेत्रे, भाग्यश्री गालफाडे यांचा समावेश आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक डक म्हणाले, व्हिप डावलून भाजपाला मदत करणाऱ्या सहा सदस्यांचा अहवाल प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे. कारवाईचा निर्णय वरिष्ठच घेतील. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून यायचे अन् इतर पक्षाला मदत करायची हे खपवून घेतले जाणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीवेळी नशिबाने दोन्ही चिठ्ठ्या राष्ट्रवादीच्या निघाल्या. त्यामुळे भाजपाला हादरा बसला. सभापती निवडीत ‘नशिबा’वरच भाजपाला ‘चान्स’ होता; परंतु अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीत अपयश आल्याने निराश झालेल्या भाजपाने सभापती निवडीतही रस दाखवला नाही. कडा गटाच्या सदस्या अनिता रवींद्र ढोबळे, पाचंग्री गटाच्या सदस्या उषा बंकट शिंदे या गैरहजर राहिल्याने भाजपा- सेनेचे संख्याबळ २७ इतके झाले़ अल्पमतात आलेल्या युतीने मैदानातून पळ काढला होता. यावेळी गटनेते मदनराव चव्हाण यांनी गैरहजर सदस्यांना नोटीस पाठविणार असल्याची घोषणा केली होती; परंतु पुढे काहीच झाले नाही.
‘व्हिप’ डावलणाऱ्यांंवर टांगती तलवार
By admin | Updated: November 6, 2014 01:36 IST