लातूर : वसंतराव नाईक महामंडळाच्या ११ लाभार्थ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा व्यवस्थापकांकडे करून तीन महिने लोटले आहेत़ मात्र यावर कसलीच कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी जिल्हा व्यवस्थापकांनी कानावर हात ठेवल्याने कारवाई रखडली आहे. लातूर जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. मात्र याचा लाभ या गरिबांना न होता, अन्य दुसऱ्यांनाच मिळत असल्याचे उघड होत आहे़ भटक्या विमुक्तांच्या नावे व दस्तावेजांचा दलाल आणि अधिकाऱ्याकडून गैरवापर करून कर्ज उचलण्यात आले आहेत़ याबाबत वसुली पथकाकडून कर्जवसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या़ त्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी कर्ज मिळाले नसल्याच्या तक्रारी जिल्हा व्यवस्थापकांकडे दिल्या आहेत़ त्याला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ मात्र अद्याप कसलीच कार्यवाही करण्यात आली नाही़ दरम्यान, अहमदपूर येथील सहा जणांनी कर्ज प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे़ महामंडळाअंतर्गत अजून किती लोकांची फसवणूक झाली आहे, हे चौकशीअंतीच बाहेर येणार आहे़ मात्र यापूर्वी दिलेल्या तक्रारी संदर्भात जिल्हा व्यवस्थापकांनी साधी चौकशीही केली नाही़ कार्यवाही तर दूरच आहे़ त्यांनी चक्क कानावर हात ठेवल्याने या प्रकरणाचा गुंता वाढत आहे़ (प्रतिनिधी)
फसवणूक प्रकरणी व्यवस्थापकांचे कानावर हात !
By admin | Updated: December 27, 2016 23:58 IST