लातूर : लातूर शहरातील ट्रान्सफार्मर जळाल्याने आणि महावितरणचे ९७ पोल उखडल्याने अर्धे शहर अंधारात राहिले. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज उपलब्ध झाली नसल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांत इंटरनेटअभावी कामकाज ठप्प राहिले.वादळी वारे अन् पावसाने लातूर जिल्ह्यात थैमान घातले आहे़ त्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे़ रविवारी रात्री लातूरच्या एमआयडीसीतील ३३ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्सफार्मर जळाल्याने रात्रभर एमआयडीसीचा बहुतांश भाग अंधारात होता़ याशिवाय तांदुळजा, गादवड, रेणापूर भागातही वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली़ पहिल्याच वादळात महावितरणचे ९७ विद्युत खांब उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ लातूर विभागात १ ते १२ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उच्चदाब वाहिनीचे १८ तर लघुदाब वाहिनीचे ९७ पोल उखडले आहेत़ तर लातूर शहरातील एमआयडीसीत असलेल्या ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर रविवारी रात्री नादुरूस्त झाल्याने या भागातील जुनी शासकीय कॉलनी, नवीन शासकीय कॉलनी, शिवाजी चौक या तीन फिडरचा वीजपुरवठा काही वेळ खंडित झाला होता़ मात्र, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी इतर वाहिनीवरून तो सुरू करण्यात आला आहे़ तांदुळजा, गादवड व रेणापूर भागात सर्वाधिक नुकसान झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले़ निलंगा विभागात ९३ पोल व ५ रोहित्र कोसळले आहेत़ उदगीर विभागात वादळी पावसामुळे उच्चदाब वाहिनीचे ४८ तर लघुदाब वाहिनीचे ११३ पोल व ३ रोहित्र कोसळल्याने या भागात वीजपुरवठा खंडित होता़ शनिवारच्या वादळात पडलेले पोल रविवारी उभे करण्यात आले आहेत़ दरम्यान, येरोळ व करडखेल उपकेंद्रातून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
अर्धे शहर अंधारात; ९७ पोलही उखडले
By admin | Updated: April 14, 2015 00:41 IST