लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील ३०० हज यात्रेकरूंचा पहिला जथा रविवारी सायंकाळी औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून थेट जेद्दाह येथे रवाना झाला. यात्रेकरूंना सोडण्यासाठी ऐतिहासिक जामा मशीद येथे भाविकांच्या नातेवाईकांनी अलोट गर्दी केली होती. चिंब डोळ्यांनी नातेवाईकांनी भाविकांची गळाभेट घेत निरोप दिला. यात्रेकरूंच्या बसला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखविला.मराठवाड्यातील यात्रेकरूंना पूर्वी हजला जाण्यासाठी मुंबई गाठावी लागत होती. एका भाविकासोबत किमान १५ नातेवाईक मुंबईला जात असत. यात्रेकरूंच्या नातेवाईकांना आर्थिक फटका तर बसतच होता, शिवाय ये-जा करण्यास बराच त्रासही सहन करावा लागत होता. मराठवाड्यातील मुस्लिम बांधवांचे दु:ख लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादहून थेट जेद्दाह अशी विमानसेवा २००४ मध्ये सुरू केली.ही सेवा आजही अखंडितपणे सुरू आहे. यंदा मराठवाड्यातील तीन हजारांहून अधिक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जाणार आहेत. १३ आॅगस्टपासून यात्रेकरूंच्या हज यात्रेला जाण्यास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जामा मशीद येथे यात्रेकरूंच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.रविवारी दुपारी १ वाजता यात्रेकरूंच्या बसला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्टÑचे प्रभारी मोहन प्रकाश, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख, आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी आ. कल्याण काळे, इब्राहीम पठाण, हज कमिटीचे चेअरमन इब्राहीम भाईजान, अॅड. सय्यद अक्रम, फेरोज खान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. चिंब डोळ्यांनी यात्रेकरूंना निरोप देण्यात आला.जामा मशीद येथून ३०० यात्रेकरूंना चिकलठाणा विमानतळावर आणण्यात आले. सायंकाळी ५.५५ वाजता पहिल्या विमानाने १५० यात्रेकरूंसह झेप घेतली. त्यानंतर रात्री ८ वाजता दुसºया विमानातून १५० यात्रेकरू रवाना झाले. दररोज दोन विमानाद्वारे यात्रेकरू रवाना होणार आहेत.
हज यात्रा : गुलाम नबी आझाद यांनी दाखविला हिरवा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:09 IST