सेलू : रबी हंगामाची पिके जोमात असताना अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली़ त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली़ तालुका कृषी अधिकारी कार्यालय व महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे पंचनामे केल्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी राम रोडगे व तहसीलदार आसाराम छडीदार यांना घेराव घालून सोमवारी हे आंदोलन केले़ मार्च महिन्यात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती़ त्यामुळे शेतातील रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व भाजीपाला व फ ळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या़ त्यानंतर महसुल विभाग व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले़ परंतु, अनेक शिवारातील पंचनामे चुकीच्या पध्दतीने करण्यात आले़ नुकसान झालेले असतानाही पंचनामे करताना चुका झाल्यामुळे शेकडो शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिले़ तालुक्यातील रायपुर, खैरी, सावंगी, निरवाडी, गिरगाव, चिकलठाणा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करताना दुजाभाव केल्याने अनेक शेतकरी वंचित राहिले, काही शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊनही तुटपुंजे अनुदान मिळाले त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांना धारेवर धरत तहसीलदार आसाराम छडीदार यांनाही जाब विचारला़ रायपुर परिसरातील शेकडो शेतकरी सोमवारी तहसील कार्यालयात दाखल झाले़ नुकसान होवूनही पंचनामे करताना दुजाभाव केल्यामुळे आम्हाला अनुदान मिळाले नाही दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत आम्ही काय करावे असा संतप्त सवालही या शेतकऱ्यांनी उपस्थित केला़ यावेळी रायपुरचे सरपंच सुंदर गाडेकर, चिकलठाण्याच्या सरपंच कमलबाई लोखंडे, रामेश्वर गाडेकर, गुलाब रोडगे, सचिन गाडेकर, राजेंद्र गाडेकर यांच्यासह या परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले़ (प्रतिनिधी)चुकीच्या पंचनाम्यामुळे शेतकरी वंचिततालुक्यात मार्च महिन्यात प्रचंड गारपीट झाली परिणामी शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली़ त्यानंतर प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याचे काम सुरू झाले़ परंतु, महसुल व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हे पंचनामे करताना गांभीर्याने काम केले नाही़ त्यामुळे नुकसान होवूनही अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागले़ तर काही शेतकऱ्यांना तुटपुंजे अनुदान मिळाले़ याद्या जाहीर झाल्यानंतर ही वंचित शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे खेटे मारले़ परंतु, त्याचा उपयोग झाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़
गारपीटग्रस्तांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By admin | Updated: July 16, 2014 00:46 IST