लाडसावंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचे उदाहण समोर आले आहे. शनिवार, २३ जानेवारी रोजी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या आठ महिलांकडे तीन दिवसांपासून कोणीही फिरकले नसल्याचे रुग्णांनी सांगितले. तसेच मोठ्या लाेकसंख्येचा भार असलेल्या या आरोग्य केंद्रात कर्मचारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळपास पन्नास हजार लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. शिवाय परिसरातील ३० ते ३५ गावांतील रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत केवळ पाच कर्मचारी हजर होते. यात मुख्य वैद्यकीय अधिकारी औषधी वाटप करणाऱ्यासह इतर मुख्य कर्मचारी गैरहजर असल्यामुळे रुग्णावर उपचार कुणी करायचे, असा प्रश्न पडला होता. यात सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एकूण साठ रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य केंद्रात मोठी गर्दी झाली होती.
२३ जानेवारी रोजी लाडसावंगी परिसरातील वेगवेगळ्या गावांतील आठ महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर गेले तीन दिवस आमच्याकडे कुणीच साधी विचारपूस करण्यासाठी आले नसल्याचे सदर महिला रुग्णांनी सांगितले. एकीकडे मार्च महिना जवळ येत असल्याने कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य केंद्रातील कर्मचारी खेड्यापाड्यातील महिलांना शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार करतात. मात्र, शस्त्रक्रिया झाली की, विचारपूसही करीत नसल्याचा अनुभव या महिलांना आला. कर्मचारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सोमवारी पंधरा कर्मचाऱ्यांपैकी केवळ पाचच कर्मचारी उपस्थित होते. शस्त्रक्रिया झालेल्या काही महिलांची प्रकृती खालावली असल्याची माहितीही समोर आली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान राऊत यांच्या वडिलांचे निधन झाल्याने ते सुटीवर आहेत, तर दुसरे वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांपासून मेडिकल रजेवर आहेत. यात दोन्ही वैद्यकीय अधिकारी सुटीवर असताना त्यांच्या जागी नियुक्ती असलेले वैद्यकीय अधिकारी सोमवारी दुपारपर्यंत आरोग्य केंद्रात आलेले नव्हते. यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णांचे हाल झाले. वरिष्ठांनी याची दखल घेऊन गैरहजर कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी रुग्णांनी केली आहे.
चौकट
भोजन आणा घरून
आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया व प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांना व सोबतच्या एका व्यक्तीच्या भाेजनाची व्यवस्था करण्याचा ठराव रुग्ण कल्याण समितीने घेतलेला आहे. मात्र, येथे रुग्णालाही भोजन दिले जात नाही, नातेवाईक तर दूरच आहेत. कुटुंब नियोजनासाठी आलेल्या महिलांना शस्त्रक्रियेनंतर सात दिवस आरोग्य केंद्रात राहावे लागते. सात दिवस रुग्णांच्या नातेवाइकांना घरूनच दोन वेळचे भोजन आणावे लागत आहे.
चौकट
कर्मचारी राहतात औरंगाबादला
लाडसावंगी आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकारी व इतर पंधरा कर्मचारी अशी संख्या आहे. मात्र, दोन शिपाई व दोन परिचारिका वगळता सर्वच जण औरंगाबाद शहरातून ये- जा करतात. यात शहरातील कार्यालयात कामकाज दाखवून चार-चार दिवस कर्मचारी आरोग्य केंद्रात येत नाहीत. शिवाय आरोग्य केंद्रात येताच गैरहजर असलेल्या दिवसाची स्वाक्षरी करून मोकळे होतात.
फोटो कॕॅप्शन : १) लाडसावंगी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेले रुग्ण २) लाडसावंगी आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या महिला.
आरोग्य केंद्रात रुग्णाची हाल कर्मचाऱ्यांअभावी रुग्णाची हाल, शस्त्रक्रिया झालेल्या महिलांकडे तीन दिवस कुणीच फिरकले नाही.