बीड : सुगंधी सुपारी, तंबाखू, गुटखा याच्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे. मात्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून टेम्पो, ट्रकमध्ये गुटखा आणून चोरट्या पध्दतीने विक्री केली जात असल्याचे यापूर्वी अनेक वेळा समोर आले आहे. कारवाई होऊनही गुटखा विक्री जोमात सुरू असल्याचे अनेक उदाहरणांवरून समोर येत आहे. बीड तालुक्यातील चौसाळा परिसरात जवळपास ५५ लाख रूपयांचा गुटखा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने पकडला होता. त्यानंतर केजजवळ ५० लाख रूपयांचा गुटखा कंटेनरमध्ये घेऊन जाताना पकडला होता. तपासादरम्यान सदरील गुटखा बाहेर राज्यातून शहर व ग्रामीण भागात चोरट्या पध्दतीने विक्री करण्यासाठी आणला जात असल्याचे समोर आले आहे. कोडिंगद्वारे गुटखा विक्री गुटख्यावर बंदी येण्यापूर्वी गुटख्याचे भाव फारसे नव्हते. परंतु आता बंदी आल्यामुळे जवळपास तिप्पट-चौपट भावाने त्याची विक्री केली जाते. पोलीस प्रशासनाने कितीही कारवाया केल्या तरीही गुटखा विक्री थांबलेली नाही. शहरातील पानटपऱ्या व ग्रामीण भागातील हॉटेल तसेच किराणा दुकानावर गुटखा उपलब्ध असतो. गुटखा पकडला जाईल या भितीपोटी दुकानदार, टपरीचालक नियमित ग्राहकांनाच गुटखा देतात. मागच्या काही महिन्यांमध्ये कारवाया वाढल्या होत्या. त्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्याने कोडिंग पध्दतीद्वारे विक्री करण्याची पध्दत अवलंबिली होती. आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याच्या बॉर्डरवरून गुटख्याची आवक होते. गुटखा साठेबाजी करणाऱ्यांविरूध्द व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. चोरट्या पद्धतीने मिळणाऱ्या गुटख्याचे भाव दिवसेंदिवस वाढविले जात आहेत. त्यामुळे गुटख्यावरील बंदी उठवावी, अशी मागणीही दबक्या आवाजात होत आहे. यातून शासनाला मोठा महसूल मिळेल. (वार्ताहर)