राजेश भिसे , जालनाग्रामीण भागाशी आपली नाळ जुळलेली असल्याने जिल्ह्याचा ग्रामीण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादकता वाढीस आपले प्राधान्य राहील, अशी भूमिका जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंगळवारी मांडली.शिवाजीराव जोंधळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. हे टाळण्यासाठी शेतीपूरक व्यवसायास शेतकऱ्यांना उद्युक्त केले जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादकता वाढीवर आपला विशेष भर राहील. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना विविध बँकांद्वारे पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. दुष्काळी स्थितीचा सर्वाधिक फटका हा कृषी क्षेत्राला बसलेला आहे. म्हणूनच आगामी काळात जलयुक्त शिवार, शेततळे, सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलली जातील. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून इतर क्षेत्रांच्या विकासाकडे आपले लक्ष असेल. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे याच जिल्ह्यातील आहेत. स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. त्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. आपल्या जिल्ह्यातही हे मिशन युद्धपातळीवर राबविण्याचा आपला प्रयत्न असेल. मिशन यशस्वी करण्यासाठी जनजागृती व इतर साधनांचा प्रभावीपणे वापर केला जाईल. ग्रामीण भागातील मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार आहे. त्यात संबंधित गावातील समस्या सोडविण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल. त्याच्या अंमलबजावणीकडेही आपले विशेषत्वाने लक्ष असेल. त्याचप्रमाणे नागपूर पॅटर्न जिल्ह्यात राबविला जाईल. जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरला आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठरविक दिवशी एका गावात संयुक्त बैठक घेतली जाईल. त्यात संबंधित गावातील तक्रारींचा निपटारा केला जाईल.जालना शहरात रेशिम क्लस्टर मंजूर झालेले आहे, अशी माहिती कळते आहे. मात्र, ते पूर्णत्वाकडे गेलेले नाही. रेशिम उत्पादन हा शेतीपूरक व्यवसाय व महिलांचे सक्षमीकरण करणारा व्यवसाय आहे. म्हणूनच संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे रेशिम क्लस्टर लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आपण विशेषत्वाने लक्ष देवू, असे जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले.नगर व इतर जिल्ह्यांमध्ये शेतकरी शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांचे अर्थाजन सुरुच राहते. हीच पद्धती जालना जिल्ह्यात राबविण्याचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यातील कृषी उत्पादकता वाढीसह ग्रामीण विकासावर देणार भर..!
By admin | Updated: May 11, 2016 00:48 IST