कंधार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश पातळीवर शह-काटशहाचे राजकारण नेत्याकडून खेळले जात आहे़ त्याची लागण तालुकास्तरावर झाली आहे़ त्यातच प्रमुख राजकीय पक्षात गटबाजी उफाळून आल्याने सामान्य कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी पसरल्याचे चित्र आहे़मन्याड खोऱ्यात शेकाप व काँग्रेस पक्षात चुरशीच्या निवडणुका होत असत़ पक्षीय पातळीवर नेते धोरणावरून, मुद्यावरून एकमेकांचे वाभाडे काढत असत़ त्यात पक्षीय कार्यक्रम, सर्वसामान्यांचे हित यावर अधिक भर दिला जात असे़ कालांतराने राजकीय पक्षांची संख्या वाढत गेली़ नेते-कार्यकर्त्यांची संख्या मोठी झाली़ भरपूर कार्यकर्त्यात निष्ठा मात्र नेत्यात विभागत गेल्या़ तरीही राज्य व देशपातळीवरील नेतृत्वाला मानणारा कार्यकर्ता गटबाजीने (ता़स्तरीय) पुरता वैतागल्याच्या घटना जुलै महिन्यात घडल्या़ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागत असल्याने गटबाजीने दर्शन होत असल्याचे बोलले जात आहे़केंद्र शासनाच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने कंधारात आंदोलन केले़ आंदोलनापेक्षा त्यात उघडपणे गटबाजी समोर आली़ बॅनरवरील मजकूर व त्यावर असलेल्या नावाला एका गटाने आक्षेप घेतला़ घोषणाबाजी कोणती करायची? यावर बरीच एकमेकावर शेरेबाजी करण्यात आली़ लोहा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते निष्क्रीय होण्यापेक्षा नेतेच सैरभैर झाले आहेत़ केंद्रात भाजपा (एनडीए) सरकार आल्याने तालुक्यात उत्साह संचारला़ नेते-कार्यकर्ते सर्वसामान्यांशी एकरूप होवून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील, अशी भावना व्यक्त होवू लागली़ परंतु लोकसभा निवडणुकीत अतिशय एकमेकांशी विचार-विनिमय करून प्रचार यंत्रणा राबविणारे अचानक एकमेकांचे उणे-दुणे काढू लागले़ उभे दोन गट मजबूतपणे समोर आले़ लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीत दिसणार का असा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे़ लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत कंधार-लोह्यात विसंवाद आला होता़ निवडणुकीनंतर भाजपातील गटबाजी उघडपणे समोर आली़ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज दोन नेत्यात गटबाजी असल्याचे मतदारसंघातील सर्वच नागरिकांना माहीत आहे़ कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत़ वरिष्ठ पातळीवर दोन नेत्यांवर कार्यकर्त्यांची निष्ठा असली तरी स्थानिक पातळीवर मात्र गटबाजीत कार्यकर्ते जोडले गेले आहेत़ येथील दोन्ही नेते जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात़ (वार्ताहर)कार्यकर्ते संभ्रमातमनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले़ यामुळे पक्षात राज्यपातळीवर मोठा उत्साह संचारला़ परंतु कंधार तालुक्यात मात्र गटबाजी विकोपाला गेली आहे़ ११ जुलै रोजी एका गटाने धरणे आंदोलन केले़ त्याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेत कार्यक्षेत्राचा प्रश्न उपस्थित केला़ पक्ष प्रतिमा खराब होत असल्याची बाब समोर आणली व दुसऱ्या पक्षाचे हस्तक असल्याचा आरोप केला़ पक्षाच्या वतीने १४ जुलैला मोर्चा आयोजित केल्याचे जाहीर केले़ मुळ व उपरे असा मनसेतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे मानली जातात़ एकपक्ष असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र गटबाजी समोर आली़
राजकीय पक्षात गटबाजी
By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST