उस्मानाबाद : मार्केटिंग फेडरेशनने नाफेड अंतर्गत आधारभूत धान्य खरेदी केेंद्र सुरु केली होती. मात्र मार्केटिंग कमिटीच्या अधिकाऱ्यांकडून प्राधान्यक्रमाला फाटा देत, धनदांडग्यांना शेतीमालाचे पैसे देण्यात आल्याचा आरोप करीत हा प्रकार थांबवून प्रतीक्षा यादीनुसार पैसे देण्यात यावेत, असे म्हणत मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. धान्य खरेदी करुन अनेक दिवसांचा कालावधी लोटला असतानाही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. असे असतानाच मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी प्रतिक्षा यादीला बगल देत, ओम राजे व त्यांच्या नातेवाईकांना शेतीमालाच्या रकमा अदा केल्या. हा एकप्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय आहे. याप्रश्नी मनसे जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत घेराव घातला. यावेळी हेमंत पाठक, दादा कांबळे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुजीत साळुंके, सोमनाथ सर्जे, अजय सपकाळ, गणेश इंगळगी, सचिन बिराजदार, वैभव मोरे, अनिकेत गवळी, शाहिद शेख, बंटी घाटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मार्केटींग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Updated: July 6, 2014 00:24 IST