अंबड : सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी अचानक शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाची पाहणी करुन माहिती घेतली. केंद्रेकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केल्याने रखडलेल्या या गटार योजनेच्या कामाला गती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.केंद्रेकर यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरात आगमन झाले. त्यांनी मत्स्योदरी देवी मंदिर पायथ्याजवळील शासकीय विश्रामगृहात सिडकोचे अभियंता, अंबड नगरपालिका मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, नगरपालिकेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन भूमिगत गटार योजनेच्या कामांची माहिती घेतली. यावेळी केंद्रेकर यांनी भुयारी गटार योजना पूर्णत्वासाठी नगरपालिकेच्या अडचणींविषयी माहिती घेतली. शहरासाठी तयार करण्यात येणाऱ्या भूमिगत गटार योजनेची पूर्ण लांबी ३२ किलोमीटर आहे. त्यापैकी ३० किलोमीटरचे काम सिडकोने पूर्ण केले आहे. मात्र आर्थिक व तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित २ किलोमीटर पाईपलाईन टाकणे व भुयारी गटार योजनेचा सर्वांत महत्वाचा भाग असलेले साडेतीन एमएलडी क्षमतेचे मल:निसारण केंद्राचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडले आहे. मल:निसारण केंद्रासाठी नगरपालिकेने जंगी तलावाजवळ सुमारे २ एकर जमीन संपादित केलेली आहे.यावेळी तहसीलदार महेश सावंत, नगरपालिका मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, नगराध्यक्षा मंगल कटारे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे, काकासाहेब कटारे, नगरसेवक शिवप्रसाद चांगले, विक्रम राजपूत, नगररचनाकार जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थिती होती. (वार्ताहर)
अंबड शहरातील रखडलेल्या भूमिगत गटार योजनेला मिळणार गती
By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST