नांदेड : शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन प्रक्रियायुक्त अन्नधान्य ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा पुढाकार घेतल्यास व उत्साह दाखविल्यास देश सुजलाम् सुफलाम् होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले़ नवा मोंढा मैदानावर कृषी विभागाच्या वतीने आयोजित ४ थ्या धान्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी धीरजकुमार बोलत होते़ यावेळी मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांची उपस्थिती होती़ जिल्हाधिकारी म्हणाले, बळीराजाच्या कष्टावर सर्वांचे जीवन अवलंबून आहे़ निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकर्यांपुढे अनेक समस्या उभ्या राहतात़ त्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे़ इस्त्रायल देशात कमी पाऊस असूनही तेथील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आज कृषी उत्पादनात वाढ झाली़ त्यामुळे आता भारतीय शेतकर्यांनीही नवीन आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन उत्पन्न वाढवावे़ निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी धान्य महोत्सव उशिराने घ्यावा लागला़ अशा धान्य महोत्सवाचे आयोजन तालुकास्तरावर किंवा मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी आयोजित करता येईल का याची तपासणी करण्यात येईल़ तेथे शेतकर्यांना आपला शेतमाल विकता येईल़ दैनंदिन विक्रीकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील़ यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात होत असून कमी पावसाची शक्यता लक्षात घेवून शेतकर्यांनी पीक नियोजन करावे़ सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासू नये म्हणून स्वत:कडील बियाणेच लागवडीसाठी वापरावे़ तर मनपा आयुक्त श्रीकांत म्हणाले, धान्य महोत्सवातून शेतकर्यांचा माल थेट जनतेपर्यंत पोहोचते़ रासायनिक खत वापरुन शेतमाल उत्पादन घेण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करुन शेतमाल पिकविला तर लोकांचे जीवनमान सुधारेल़ यावेळी डॉ़ शिवाजीराव शिंदे, रामराव कदम, संजय सूर्यवंशी, माधवराव पाटील झरीकर, भागवत देवसरकर, दिलीप पावडे, कृषी विकास अधिकारी एम़ टी़ गोंडेस्वार, प्रभारी प्रकल्प संचालक वैशाली कुलकर्णी, पंडित मोरे, उपसंचालक एस़ व्ही़ लाडके, उत्तम शिवणगावकर, उपस्थित होते़ प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस़ जी़ पडवळ, सूत्रसंचालन शिवराज मुगावे तर तालुका कृषी अधिकारी आऱ एम़ देशमुख यांनी आभार मानले़ पाणलोट चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या वैष्णवी महाबळे, अश्विनी नांदेडकर, कावेरी सुवर्णकार, राजश्री जकीलवाड, कौशल थोरात, ऋतुजा खानापूरकर यांना बक्षिसे देण्यात आली़ (प्रतिनिधी)
शेतकर्यांच्या उत्साहातून हरित क्रांती
By admin | Updated: May 26, 2014 00:46 IST