उस्मानाबाद : जिल्ह्यातील उन्हाचा पारा ४० अंशाच्या वर गेला असून, वाढत्या उन्हामुळे अबाल-वृध्द हैैराण झाले आहेत़ वाढत्या उन्हामुळे ज्वरासह इतर साथरोग पसरत आहेत़ मंगळवारी कमाल ४०़२ अंश सेल्सीअस तर किमान २२़३ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली़ त्यातच अस्वच्छ पाण्यामुळे जुलाबाच्या रूग्णांची संख्याही शासकीय रूग्णालयात वाढली आहे़सर्वाधिक सूर्यप्रकाश मिळणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याचा पारा यंदाही ४० अंशाच्या पुढे गेला आहे़ मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवून लागली होती़ मध्यंतरीच्या दहा-पंधरा दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्हावासियांना काही प्रमाणात उन्हापासून दिलासा मिळाला होता़ मात्र, मागील पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे़ यात २४ एप्रिल रोजी कमाल ३८़६ तर किमान २३़३ सेल्सीअस, २५ एप्रिल रोजी कमाल ३७.८ तर किमान २१़७ सेल्सीअस, २६ एप्रिल रोजी कमाल ३८़६ तर किमान २३़३ सेल्सीअस, २६ एप्रिल रोजी कमाल ३८़१ तर किमान २२़३ सेल्सीअस, २७ एप्रिल रोजी कमाल ३७़१ तर किमान २३़७ सेल्सीअस अंश तर मंगळवारी २८ एप्रिल रोजी यावर्षीचा सर्वाधिक ४०़२ अंश सेल्सीअस तापमान नोंदविले गेले़ तर किमान २२़३ सेल्सीअस तापमान होते़ वाढत्या उन्हामुळे वयोवृध्दांसह उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ तर लहान मुलांमध्ये ज्वराचे प्रमाण अधिक दिसून येत आहे़ वाढत्या उन्हामुळे कलिंगडासह शितपेयांची मागणी वाढली असून, ठिकठिकाणी हे साहित्य खरेदी करणाऱ्यांची गर्दी दिसून येते़ ‘स्टोन’चा त्रास असलेल्या रूग्णांनाही या उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता दिसून येते़ (प्रतिनिधी)
उन्हाचा पारा चाळीस अंशावर..!
By admin | Updated: April 29, 2015 00:53 IST