कडा : आष्टी तालुक्यातील तब्बल सहा हजार वृद्ध, निराधार, भूमिहिन, विधवा, परित्यक्त्या आदी लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षांत महिना ६०० रुपये आर्थिक अनुदान मिळू लागले आहे. शासनाच्या या योजनेचा फायदा मिळत असल्याने अनेकांचे जगणे सुसह्य झाले आहे. निराधार महिला किंवा पुरूषांना सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने वृद्धापकाळात त्यांची परवड होते. आष्टी तालुक्यात अनेक निराधार ७० ते ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. वय झाल्यामुळे त्यांना शारीरिक कष्टाची कामेही होत नाहीत. अगोदरचेच अठराविश्व दारिद्रय. त्यात वय झाल्याने आर्थिक उत्पन्नही मिळत नाही. अशावेळी अनेक वृद्ध, निराधारांना विपन्नावस्था येते. जगावे की मरावे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर निर्माण होतो. अशावेळी त्यांच्यासाठी श्रावणबाळ योजना फलदायी ठरल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. ज्या स्त्री- पुरूषांना सांभाळण्यासाठी कोणीही नाही व त्यांना शारीरिक कामेही होत नाहीत. परिणामी त्यांची उपासमार सुरू आहे. अशा ४ हजार ७९५ स्त्री, पुरूषांना या योजनेचा लाभ आष्टी तालुक्यात दिला गेला आहे. आष्टी येथील तहसीलमध्ये तालुक्यातून सतत वृद्ध, निराधारांची ये- जा असते. अशांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी व त्यांना वेळच्यावेळी आर्थिक मदत मिळावी, यासाठी येथे तालुका समन्वय समितीने वेळच्यावेळी बैठका घेऊन अनेकांचे अर्ज मंजूर केले. अशा लाभार्थ्यांना मानधन मिळू लागल्याने वृद्धापकाळात त्यांचा भुकेचा प्रश्न मिटला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप यांनी सांगितले. अनेक कारणांनी पन्नाशीही न ओलांडलेल्या महिला विधवा होतात. अशा महिलांसमोरही आयुष्य कसे जगावे असा प्रश्न असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदारच हरवल्याने अनेक महिला हतबल झालेल्या असतात. कधी-कधी अशा विधवा महिलांवर त्यांच्या लहान- लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्नही असतो. अशा महिला खचून जाऊन नयेत व त्यांना त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करता यावा, यासाठी ४०० पेक्षा अधिक विधवांना मासिक ६०० रुपये मानधन सुरू करण्यात आले आहे. हे मानधन अल्प असले तरी विधवा महिलांना आपले जीवन जगण्यासाठी मदतीचे ठरत असल्याचे येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या छाया खंडागळे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत तब्बल १०२० लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचाही लाभ मिळालेला आहे. तर इंदिरा गांधी योजनेचाही काही लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. एकूण ६ हजार २१५ लाभार्थ्यांना अनुदान मिळत असल्याची माहिती आष्टीचे तहसीलदार राजीव शिंदे, श्रावणबाळ समितीचे तालुकाध्यक्ष राम मधुरकर यांनी सांगितले. शासनाच्या या योजनेचा वृद्ध, विधवा, असाह्य यांना लाभ मिळाला असल्याने जीवन जगण्यास अनेकांना फायदा झाला असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय खंडागळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
सहा हजार लाभार्थ्यांना अनुदान
By admin | Updated: August 14, 2014 01:57 IST