संजय कुलकर्णी , जालनासिंचन विहिरींच्या कामांवर लागणारे साहित्य अनेकवेळा लाभार्थी स्वत:च खरेदी करतात. मात्र देयके देताना लाभार्थ्यांच्या नावे ते अदा करता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींमार्फतच साहित्य खरेदीची अट शासनाने कायम ठेवली आहे. मात्र त्यासंबंधीच्या सूक्ष्म बाबींबाबत सुधारित आदेशही जारी केले आहेत.जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या चार हजार विहिरींच्या कामांपैकी अनेक कामांवर कुशल बाबींवरील खर्च कमी आहे. ग्रामपंचायतमार्फत साहित्य खरेदी करण्याचे आदेश आहेत. परंतु सध्या बऱ्याच ठिकाणी लाभार्थी मार्फत प्रत्यक्षात साहित्य खरेदी होते. साधारणत: लाभार्थ्यांना साहित्य खरेदी करताना रोख रक्कम अदा करावी लागते. अनेक लाभार्थींकडे रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थी साहित्य खरेदी करू शकत नाहीत. सर्व लाभार्थी वित्तीय नियमावलींशी परिचित नसतात. काही लाभार्थी स्वत:च्या नावाने देयके घेतात. अशी देयके पारित करताना पंचायत समिती स्तरावर अडचणी निर्माण होतात. या अडचणींवर मात करण्यासाठी सिंचन विहिर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा ग्रामपंचायतींमार्फतच करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. कारण ग्रामपंचायत अंमलबजावणी यंत्रणा आहे. मंजूर दरानुसार व तांत्रिक अधिकाऱ्याने प्रमाणित केलेल्या परिणामाच्या मर्यादेत, ग्रामपंचायतीने लाभार्थींच्या मागणीनुसार निश्चित विक्रेत्याला पुरवठा आदेश निर्गमित करावे. पुरवठा आदेशाची प्रत लाभार्थ्याला द्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. नवीन सिंचन विहिर मंजूर करताना इतर अकुशल कामे प्राधान्याने करावीत, असेही आदेशात म्हटले आहे. या कामांमध्ये वृक्ष लागवडीची / फळझाड लागवड/ शेततळे/ भूसुधारणेची कामे अशी मंजूर कामे घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. (समाप्त)
विहिरींसाठीचा साहित्य पुरवठा ग्रामपंचायतींमार्फतच
By admin | Updated: March 28, 2015 00:41 IST