बीड : राजकीय वर्तुळात ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच अशी पदे गाजविल्यानंतर एका तरुणाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून विक्रीकर सहायक होण्याचा मान मिळविला. जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत पोहोचलेल्या तरुणाचे नाव आहे मच्छिंद्र नामदेव वाघ.मच्छिंद्र वाघ हे मूळचे पाटोदा तालुक्यातील वाघाचा वाडा येथील रहिवासी. त्यांचे वडील निवृत्त शिक्षक आहेत. डीएड पदवी संपादन केल्यानंतर मच्छिंद्र यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले; परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. २०१२ मध्ये तळेगाव ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली. या ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या वाघाचा वाडा येथील मच्छिंद्र वाघ यांना गावकऱ्यांनी निवडणूक रिंंगणात उतरण्याची विनंती केली. त्यांनी अर्ज दाखल केला अन् त्यांची बिनविरोध निवड झाली. पुढे त्यांना उपसरपंचपदाची संधीही मिळाली. पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायत निवडणुका लागल्या. सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. मात्र, राजकारणात त्यांचे मन रमले नाही. गावाचा कारभार सांभाळताना त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरुच ठेवला. २०१६ मध्ये त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची सहायक विक्रीकरपदाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. त्यांनी प्रशासकीय सेवेला प्राधान्य देत ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला. निवडीचे सरपंच बाळासाहेब चौरे, उपसरपंच बन्सी दुरुंदे, पोहेकॉ जयसिंग वाघ, बबन जाधव यांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)
ग्रा.पं. सदस्य झाले विक्रीकर सहायक
By admin | Updated: March 18, 2017 23:16 IST