तुळजापूर : राज्यात विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे़ चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, या दुष्काळाबाबत राज्य शासन मात्र उदासिन दिसत आहे़ चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत़ छावणीला शासनाकडून वेळेवर पैसे मिळत नाहीत़अधिकारी वर्ग मंत्र्यांचे ऐकत नाही़ प्रशासनावरच शासनाचा वचक राहिलेला नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले़खा़ अशोक चव्हाण यांनी रविवारी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ यानंतर त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप केला. खा़ चव्हाण म्हणाले, युती शासनामध्ये असलेल्या भाजपा- शिवसेनेत सुसंवाद नाही़ त्यामुळे दोन्ही पक्षाचे मंत्री आपापल्यात कुरघोड्या करण्यात व्यस्त आहेत़ परिणामी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गंभीर बनत आहेत़ विरोधक म्हणून आम्हाला दुष्काळात राजकारण करायचे नाही़ कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न पाणी न्यायप्राधिकरणाने सोडविला पाहिजे़ परंतु, ते हा प्रश्न सोडवित नसल्याने न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागतो़ सध्याची नैसर्गिक आपत्ती मोठी आहे़ परंतु पालकमंत्र्यांना याचे गांभीर्य नाही, अशी टीकाही खा़ चव्हाण यांनी केली़ यावेळी आ़ मधुकरराव चव्हाण, जिप अध्यक्ष धीरज पाटील, आ़ अमर राजूरकर, अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, सचिन पाटील, विनित कोंडो, अनंत कोंडो, सिध्दार्थ बनसोडे, महेबुब पटेल, विशाल कोंडो आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)आगामी काळात होणाऱ्या नगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायची की नाही, हा निर्णय जिल्हा काँग्रेस कमिटी घेणार आहे़ परिस्थिती पाहून स्वबळ किंवा आघाडी हे दोन्ही पर्याय जिल्हा कमिटीच्या समोर असल्याचेही खा़ चव्हाण यांनी सांगितले़
सरकारचा प्रशासनावर वचक नाही
By admin | Updated: May 8, 2016 23:37 IST