जालना : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार संवेदनाहीन झाली आहे. त्यांच्या संवेदनेला जागे करण्यासाठीच राष्ट्रवादी कॉग्रेस कडून येत्या १४ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले नाही तर दुसऱ्या टप्यात मुख्यमंत्र्यासह त्यांच्या मंत्र्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला. जालना येथे जेलभरो आंदोलनाच्या तयारीसाठी बुधवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष आ. अॅड. निरंजन डावखरे, आ. नरेंद्र पाटील, आ. राजेश टोपे, माजी आ. शंकरअण्णा धोडंगे, माजी खा. गणेशराव दुधगावकर, माजी आ. चंद्रकांत दानवे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, उपनगराध्यक्ष शाह आलम खान, राष्ट्रवादी अलपसंख्याक सेलचे इकबाल पाशा, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदींची उपस्थिती होती.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तटकरे म्हणाले की, मराठवाड्यात १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या काळी अन्न धान्य नव्हेत. मात्र पाणी होते. यावेळी तर अन्य धान्यासह पाण्याचाही ठणठणाट झालेला आहे. मात्र संवेदनाहीन सरकारला हे दिसत नाही. २०१२- १३ सालच्या दुष्काळाच्या वेळी आमच्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना भरभरून मदत केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वातंत्र्यानंतर पहिलांदाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. ७२ हजार कोटीचे कर्ज माफ केले. भाजपा सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या एकही निर्णय घेतला नाही. पुरवणी मागण्यासाठी २० कोटी कुठून आले असा सवाल ही त्यांनी व्यक्त केला.मुंख्यमंत्र्यानी मराठवाड्यातील तीन जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला व औरंगाबादेत मंत्रीमंडळ बैठक घेतली. तीही नावालाच. ते दुष्काळी दौऱ्यासाठी आलेलेच नव्हते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीसाठी आले होते. कामात काम दुष्काळाची पाहणी करून गेले. मराठवाड्यात सर्वात भीषण दुष्काळ हा जालना जिल्ह्यात आहे. त्यांनी येथे जवळच येवून जिल्ह्याचा दौरा सुद्धा करण्याची तसदी घेतली नाही. जालना जिल्ह्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे दोघे राज्याचे नेतृत्व करणारे नेते असतानाही ते जिल्ह्यातील दुष्काळ प्रश्नावर गप्प राहिले. त्यांनी जिल्ह्याचा दुष्काळ प्रभावीपणे मुख्यमंत्र्यांपुढे मांडायला त्यांची हिमंत झाली नाही. त्यांच्यात हिंमत असती तर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला असता. हे दोन्ही नेते मातीशी इमान राखू शकले नाही. त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही.जेलभरो आंदोलनात राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही तटकरे यांनी केले.यावेळी बोलताना आ. राजेश टोपे म्हणाले की, जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीपाचे १०० टक्के पिके वाया गेली आहेत. जनावरांना चारा नाही. आजच जिल्ह्यात २०० च्यावर टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यावर उपाय योजना केल्या नाहीत तर ही परिस्थिती पुढे भीषण होईल. त्यामुळे सरकारने त्वरीत उपाय योजना कराव्यात. खरीपाच्या पिकांना अनुदान द्यावे, बँक, विजेची होणारी वसूली थांबवावी. शेतकऱ्यांना संपूर्ण माफी द्यावी. या व अन्य मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी होवून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन टोपे यांनी केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर येथील शिवसेनेचे आ. अर्जुन खोतकर यांनी आवाज उठवून सरकार विरूद्ध रान पेटविले. आता त्यांनी याच प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही तटकरे यांनी खोतकर यांना केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार संवेदनाहीन- सुनील तटकरे
By admin | Updated: September 10, 2015 00:29 IST