जालना : सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याबरोबरच त्यांच्या मनातील महाराष्ट्र निर्मितीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.परतूर येथे १७६ गावांच्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. २२० के. व्ही. वीजकेंद्राचा लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात तावडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. नारायण कुचे, माजी आ. विलास खरात, माजी आ. अरविंद चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव, राहुल लोणीकर, रामेश्वर भांदरगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तावडे म्हणाले की, गत दोन वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून जलयुक्त शिवार, रस्तेविकास, विद्युत विकास यासारखी अनेकविध विकास कामे यशस्वीपणे करण्यात येत असलयाचे सांगितले.वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक प्रमाणात पाणी व योग्य दाबाने वीज देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्यात अनेक वर्षांपासून सिंचनाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिचाई योजनेच्या माध्यमातून राज्याला १८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येणाऱ्या काळात प्रलंबित सर्व प्रकल्पाचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील निम्नदुधना प्रकल्पाचे कामही अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. पंतप्रधान सिचाई योजनेमधून या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे कामही तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा देण्यासाठीही निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री लोणीकर म्हणाले, औरंगाबाद येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत १५ हजार कोटी रुपये खर्चाच्या वॉटरग्रीड योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. २३४ कोटी रुपये खर्चून परतूर येथे करण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या वॉटरग्रीड योजनेच्या माध्यमातून मंठा, परतूर व जालना तालुक्यातील १७६ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून सिंचन, आरोग्य, शिक्षण यासह इतर सर्व बाबींचा अनुशेष भरुन काढत जिल्ह्याची यशस्वीपणे विकासाकडे वाटचाल सुरु असून राज्यातील पहिली वॉटरग्रीड परतूर येथे होत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, परतूर शहरात उभारण्यात येणाऱ्या ग्रीडवॉटर योजनेप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यासाठी अशी एक योजना येणाऱ्या काळात उभी करावी. जिल्ह्याची पारदर्शीपणे व गतिमानतेने विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समारोपात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा. राज्यात पाण्याचे शाश्वत साठे निर्माण करण्यासाठी दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान अत्यंत उपयुक्त ठरले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नद्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करण्याबरोबरच पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये अडविणे व जिरवणे गरजेचे आहे. या कार्यक्रमास विजय गव्हाणे, भाऊराव देशमुख, वीरेंद्र धोका, सुनील आर्दड, विलास नाईक, गोपाळराव बोराडे, भाऊसाहेब कदम, हरिराम माने, मदनलाल सिंगी, शहाजी राक्षे, गणेश खवणे, माऊली शेजुळ, राजेश मोरे उपस्थित होते.
सामान्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध
By admin | Updated: January 3, 2017 23:32 IST