तामलवाडी : जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत जागेचा मालकी हक्क प्रशासनाने सिध्द करून उर्वरित जागा आपल्या ताब्यात द्यावी, या मागणीसाठी एका माजी सैनिकाने सोमवारी शाळेला कुलूप ठोकून आमरण उपोषण सुरू केले आहे़ शाळेला कुलूप ठोकल्याने तब्बल ७५४ विद्यार्थ्यांना मैदानावर बसून रहावे लागले़ विशेष म्हणजे प्रशासनाने याची साधी दखलही घेतली नाही़ दरम्यान, माजी सैनिक डोईफोडे यांनी जागेचा प्रश्न निकाली निघेपर्यंत शाळेचे कुलूप काढणार नसल्याची भूमिका घेतल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांची मोठी तारंबळ उडाली आहे़१९६२ मध्ये कैै.कालिदास लिंगफोडे यांनी शाळा व दवाखान्यासाठी जमीन दान केली होती़ प्रशासनाने त्यावर टोलेजंग इमारत उभारली, मात्र, जमिनीची नोंद ग्रामपंचायत, भूमिअभिलेख आदी आवश्यक त्या ठिकाणी करण्यात आली नाही़ प्रशासनाने जागेचा मालकीहक्क सिध्द करून शाळेजवळील शिल्लक जागा ताब्यात मिळावी, यासाठी सावरगावचे माजी सैनिक दत्तात्रय लिंगफोडे यांनी २५ जुलैै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देवून शाळेच्या मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता़ मात्र, प्रशासनाने त्यांच्या निवेदनाची दखल घेतली नाही़ सोमवारी दत्तात्रय लिंगफोडे यांनी सकाळी प्रार्थनेनंतर शाळा सुरू करण्यास मज्जाव केला आणि शाळेला कुलूप ठोकले़ त्यामुळे ७५४ विद्यार्थ्यांना मास्तरांनी मैदानात बसवून ठेवले़ तसेच शालेय पोषण आहाराचा खाऊही विद्यार्थ्यांना मिळाला नाही़ अखेर १२ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी शिक्षणाविनाच घराकडे निघून गेले़ १९९७ पासून शाळेच्या मालकी हक्काबाबत वाद चालू आहे़ तर शिल्लक जागेची नोंद ग्रामपंचायतीने दाखला घेतला आहे़ त्यामुळे जागेचा प्रश्न वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे़ (वार्ताहर)
प्रशासनाचा हलगर्जीपणा ‘उघड्यावर’
By admin | Updated: August 12, 2014 01:57 IST