नांदेड : राज्य शासनाने गुटखाबंदीचा निर्णय घेतला़ परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आयात केला जात आहे़ त्यात गुटखाबंदी पोलिसांसाठी कुरणच बनली असून तोडपाणी जोरात सुरु आहे़ शासनाने राज्यात गुटखाबंदी निर्णय घेतल्यानंतर गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात साडे चार कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़ १६ जुलै रोजी दीड कोटींचा गुटखा पकडला होता़ सध्या अन्न व औषध प्रशासनाकडे दोन तालुक्यांसाठी एक अधिकारी अशी अवस्था आहे़ त्यामुळे गुटखाबंदीच्या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी करणे अवघड जात आहे़ त्यात शेजारील आंध्रप्रदेशातून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची छुप्या मार्गाने आयात करण्यात येत आहे़ रेल्वे, बस, खाजगी वाहने याद्वारे गुटखा नांदेडात आणण्यात येत आहे़ पोलिसांनी गुटखा पकडल्यास तक्रार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाच द्यावी लागते़ परंतु अनेक ठिकाणी पोलिसांकडूनच गुटखा पकडल्यानंतर तोडपाणी सुरु असल्याचे दिसत आहे़ यापूर्वी आंबेडकर चौकात पकडलेल्या गुटख्याच्या टेम्पोमध्ये बिस्कीटे भरण्याची किमया पोलिसांनी केली होती़ त्यानंतर शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या एकाच व्यापाऱ्यांवर तब्बल पाच ते सात वेळा गुन्हे नोंदविण्यात आले़ परंतु कायमचा बंदोबस्त करण्यात मात्र पोलिसांना अद्याप यश आले नाही़ गुटखा पकडल्याचा गवगवा करायचा अन तोडपाणी करुन मोकळे व्हायचे असाच कित्ता गिरविला जात आहे़ त्यामुळे सहजपणे गुटखा खरेदी व विक्री होत आहे़ (प्रतिनिधी)
गुटखाबंदी पोलिसांसाठी कुरण
By admin | Updated: August 24, 2014 23:48 IST