पैठण : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधी दि. १२ जून रोजी पैठण येथील मोक्ष तीर्थ असलेल्या गोदावरीच्या कृष्ण कमल तीर्थ घाटावर होणार आहे. शांतिब्रह्म एकनाथ महाराज मंदिरामागे असलेल्या गोदावरीच्या कृष्ण कमल घाटावर सकाळी १० वा. दशक्रिया विधीस प्रारंभ होणार आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबियांचे सकाळी ८.३० वा. पैठण येथे आगमन होणार आहे. पैठण येथील अनंत खरे व त्यांचे सहकारी ब्रह्मवृंद दशक्रिया विधी पार पाडणार असून यात पिंडदान, मंत्राग्नीसह गोपीनाथ मुंडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याने नारायण नागबळीची पूजा करण्यात येणार असल्याचे श्रीक्षेत्र उपाध्ये वे.शा.सं. गुरू अनंतशास्त्री खरे यांनी सांगितले. या ठिकाणी स्व. गोपीनाथ मुंडे यांची भव्य प्रतिमा असलेले व्यासपीठ उभारण्यात आले असून या प्रतिमेसमोर अस्थी कलश ठेवण्यात येणार आहे, तर याच व्यासपीठाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी जनतेच्या दर्शनासाठी दुपारी १ वाजेपर्यंत अस्थी कलश ठेवण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी अनेक केंद्रीय मंत्री व राज्यातील इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी आमदार संदीपान भुमरे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, सुनील रासणे यांनी सांगितले. व्हीआयपीचे स्वतंत्र कक्ष विधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत व यासाठी भाजपाचे ५०० स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.एलईडीवर थेट प्रक्षेपण दशक्रिया विधी सर्वसामान्य जनतेस पाहता यावा म्हणून मंडपात आठ बाय बारा आकाराच्या एलईडी टीव्ही संचावरून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पार्किंग व्यवस्था पैठण नगर परिषदेच्या वाहनतळावर व्हीआयपीच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. अहमदनगर-शेवगाव व बीडकडून येणाऱ्या वाहनांसाठी अभिनंदन मंगल कार्यालयाच्या मैदानात, तर औरंगाबाद येथून येणाऱ्या वाहनांसाठी जांभूळ बनात, दक्षिण काशी मैदान, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गोदापरिक्रमेचा शुभारंभ व दशक्रिया विधी एकाच घाटावरसन २००६ मध्ये ज्या ठिकाणाहून गोदा परिक्रमेची सुरुवात करण्यात आली होती, त्याच कृष्ण कमल घाटावर गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधी होणार आहे. त्यामुळे पैठणकर भावुक झाले आहेत. (वार्ताहर)बंदोबस्तासाठी अधिकाऱ्यांसह दोन हजारावर पोलीसकायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त राहणार आहे. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्यासह ७ पोलीस अधीक्षक, १२ उपविभागीय पोलीस अधिकारी, २५ पोलीस निरीक्षक, ७५ सहायक पोलीस निरीक्षक व फौजदार यांच्यासह १६०० पोलीस कर्मचारी आणि ४ एसआरपीचे प्लाटून तैनात करणार असल्याचे पैठणचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी सांगितले. नाथ मंदिर परिसरात १ लाख स्क्वेअर फुटाचा मंडपदशक्रिया विधीसाठी नाथ मंदिर परिसरात १ लाख स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे. यात गर्दी व लोटालाटी होऊ नये म्हणून ५० बाय ५० चे अवरोध असणारे शेकडो कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. पिंड दर्शनासाठी क्रमाक्रमाने या कक्षातून जनतेला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे एकाचवेळी गर्दी होणार नसल्याचे कचरू घोडके, धनंजय कुलकर्णी, सुवर्णा रासने यांनी सांगितले. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास मंडप कमी पडू नये म्हणून ४० हजार स्क्वेअर फुटाचा राखीव मंडप नाथ मंदिरालगत असलेल्या गीता मंदिरासमोर उभारण्यात येत आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाचे पैठण येथील गोदावरीत उद्या विसर्जन
By admin | Updated: June 11, 2014 00:53 IST